पेरणे–लोणीकंद जिल्हा परिषद गटातील राजकारणाला आता विकासाचा स्पष्ट चेहरा मिळू लागल्याचे संकेत वडगाव शिंदे येथे आयोजित भाजपच्या संवाद मेळाव्यातून मिळाले. “जनतेचा विश्वास हाच माझ्यासाठी आशीर्वाद असून, गटाचा सर्वांगीण विकास हाच माझा एकमेव ध्यास आहे,” असे ठामपणे सांगत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार पै. किरण संपत साकोरे यांनी मतदारांसमोर आपली सर्वांगीण विकासाची भूमिका स्पष्ट केली. नागरिकांच्या प्रचंड उपस्थितीने हा मेळावा केवळ प्रचारसभा न राहता जनतेच्या अपेक्षांचे जाहीर समर्थन ठरला.
मेळाव्यात बोलताना पै. किरण साकोरे यांनी शब्दांपेक्षा कामाला महत्त्व देणाऱ्या राजकारणाची गरज अधोरेखित केली. “दिखावू घोषणा करून जनतेची दिशाभूल करण्याचे राजकारण आता थांबले पाहिजे. पेरणे–लोणीकंद गटातील प्रत्येक गावात शुद्ध पाणीपुरवठा, मजबूत व सुरक्षित रस्ते, दर्जेदार आरोग्य सुविधा, शिक्षणाची सक्षम व्यवस्था आणि स्वच्छतेचा ठोस आराखडा हे आमचे प्राधान्य आहे. महिलांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहत त्यांना सक्षम करणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवू,” असे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक प्रचारादरम्यान ‘डोअर टू डोअर’ संपर्क साधत पै. साकोरे यांनी गावागावातील वास्तव परिस्थिती जाणून घेतली आहे. नागरिकांच्या अडचणी थेट ऐकून त्यावर उपाययोजना करणारा नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे केवळ आश्वासन देणाऱ्या नव्हे, तर प्रत्यक्ष काम करणाऱ्या उमेदवारालाच संधी द्यावी, अशी ठाम भूमिका मतदारांमध्ये आकार घेत असल्याचे दिसून येत आहे.
लोणीकंद पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार मोनिका श्रीकांत कंद यांनीही यावेळी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, “कंद परिवाराने कायम राजकारणाला समाजसेवेची जोड दिली आहे. आमचे मार्गदर्शक प्रदीपदादा कंद यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केवळ निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे, तर गणाच्या सर्वांगीण विकासासाठी रिंगणात उतरलो आहोत.” प्रचाराच्या निमित्ताने गावागावातील प्रश्न समजून घेत ते सोडवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
या मेळाव्याला पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप कंद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देत त्यांनी पेरणे–लोणीकंद गटाच्या विकासासाठी भाजपच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी भाजप क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पै. संदिप भोंडवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रविंद्र कंद, पेरणे पंचायत समिती गणाच्या उमेदवार राणी दत्तात्रय वाळके, तसेच वडगाव शिंदे येथील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित जनसागर आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पेरणे–लोणीकंद गटात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसून येत आहेत.
छायाचित्र ओळ : वडगाव शिंदे येथे आयोजित सहकारी संवाद मेळाव्यात जनतेशी संवाद साधताना भाजपचे अधिकृत उमेदवार पै. किरण साकोरे; सभास्थळी उसळलेला जनसागर.
