मारुती भूमकर यांच्या प्रमुख उपस्थितीतवढू बुद्रुकच्या ‘माहेर’ संस्थेत ३१० व्या जावयाचे स्वागत; बेवारस लेकींचा संसार थाटात झाला साजरा!
वढू बुद्रुक (ता. शिरूर) दिनांक १७ जानेवारी : ज्यांच्या आयुष्याच्या वाटेवर केवळ संकटांचे काटे होते, त्यांच्यावर आज अक्षतांचा वर्षाव झाला. जन्माने अनाथ ठरलेल्या पण कर्माने ‘माहेर’च्या लाडक्या लेकी झालेल्या संगीता आणि काजल यांचा विवाह सोहळा म्हणजे माणुसकीच्या झऱ्याचे जिवंत उदाहरण ठरला. वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील ‘माहेर’ संस्थेच्या अंगणात सनई-चौघड्यांचे मंगल सूर घुमले आणि या दोन लेकींनी अनाथपणाच्या अंधारातून सुखाच्या उंबरठ्यावर पहिले पाऊल टाकले.
काही वर्षांपूर्वी काजल हिला चिंभळी येथील बालगृहातून, तर संगीता हिला नानापेठ येथील संस्थेतून अत्यंत निराधार अवस्थेत ‘माहेर’मध्ये आणले गेले होते. ‘माहेर’च्या संस्थापिका लुसी कुरीयन यांच्या मायेच्या छायेखाली या दोघी लहानाच्या मोठ्या झाल्या. संस्थेने केवळ त्यांना आश्रय दिला नाही, तर संस्कार आणि शिक्षणाचे बाळकडू देऊन स्वतःच्या पायावर उभे केले. आज काजलचा विवाह सातारा येथील व्यावसायिक आनंदा गायकवाड यांच्याशी, तर संगीताचा विवाह सणसवाडी येथील अनिकेत दाभाडे यांच्याशी मोठ्या थाटात संपन्न झाला.

माहेरला मिळाला ३१० वा जावई: माहेर संस्थेने आजवर शेकडो निराधार लेकींची लग्ने लावून दिली आहेत. आज या सोहळ्याने संस्थेला ३१० वा जावई मिळाला. सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मारुती भूमकर आणि लुसी कुरीयन यांच्या उपस्थितीत, मधुसूदन शिंदे गुरुजींच्या मंत्रोच्चारात हा विवाह पार पडला. यावेळी आपल्या लाडक्या लेकींना सासरी पाठवताना ‘माहेर’मधील प्रत्येक सदस्याचे डोळे पाणावले होते, मात्र हे आनंदाश्रू त्या लेकींच्या उजळलेल्या भविष्यासाठी होते.
रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मारुती भूमकर आणि लुसी कुरीयन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मधुसूदन शिंदे गुरुजी यांनी पौरोहित्य केले. या मंगल प्रसंगी माहेरच्या अध्यक्षा हिराबेगम मुल्ला, विश्वस्त योगेश भोर, रमेश दुतोंडे यांच्यासह केरळवरून खास आलेले बेंनी पोक्काचली आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. आपल्या लेकींना सासरी पाठवताना माहेरच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळत होते.
