महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील नियंत्रण कक्षात बैठक झाली. या बैठकीत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे, ठाणे शहर आमदार संजय केळकर, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील आपत्ती परिस्थिती हाताळण्यासाठी उपाययोजना, विभागांमधील समन्वय, बचाव व मदत कार्याची तयारी, पुनर्वसन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना यावर चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बचाव पथके व साधनसामग्री तत्काळ उपलब्ध ठेवण्याचे, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्याचे आणि माहितीचे वेगवान आदानप्रदान करण्याचे निर्देश दिले.
नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये आणि गरज भासल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी सांगितले की, राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध असून अतिवृष्टीमुळे प्रभावितांना तातडीची मदत आणि योग्य पुनर्वसन मिळावे यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत.