कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथे एस टी स्टँड आहे पण एस टी बस काही थांबत नसायची प्रवाशांची मोठी गैरसोय व्हायची याच समस्येला सोडवण्यासाठी व कोरेगाव भीमा येथे एसटी बसेसना थांबा मंजुरीसाठी कोरेगाव भीमा ग्रामपंचायत व सरपंच संदिप ढेरंगे यांनी एसटी महामंडळांकडे गेले दोन महीने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून एसटी महामंडळांने थांबा मंजुर केल्याने या थांब्यावर पुणे – नगर महा मार्गावरून ये-जा करणाऱ्या एसटी बसेस थांबण्यास सुरुवात झाली आहे.
कोरेगाव भीमा येथे ग्रामस्थांसह नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्यास आलेल्यांची संख्या सुमारे ३० हजाराहून अधिक आहे. मात्र नगर महामार्गावर पुण्याहून अहमदनगरकडे जाताना शिरुर तालुक्यातील पहीले व औद्योगिकदृष्ट्या महत्वाचे गाव असलेल्या कोरेगाव भीमा येथे तसेच हमरस्त्यालगत राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या मालकीची जागा असूनही एसटीच्या बसेसना थांबा नव्हता. त्यामुळे बाहेरगावचे प्रवासी, तसेच कामगार, विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण, व्यापारी यासह सर्वच प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेवून या ठिकाणी तातडीने थांबा मंजुर करावा, अशी मागणी कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच संदीप ढेरंगे यांनी लेखी निवेदनाद्वारे राष्ट्रीय परिवहन महामंडळाकडे केली होती.
गेली दोन केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर एसटी महामंडळाचे अधिकारी सुरेश मेंहदळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी येवून येथे एस टी थांब्याचा अधिकृत फलक लावून बससेवेची नुकतीच सुरुवात केली. यावेळी कोरेगाव भीमा ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचा सन्मानही करण्यात आला.
या बससेवेमुळे कोरेगाव भीमा पंचक्रोशीतील गावांतील ग्रामस्थ, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण, व्यापारी आदींसह नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने या परिसरात स्थलांतरीत झालेल्या विदर्भ मराठवाड्यांतील अनेक कुटूंबांनाही होणार आहे. या सर्वांना एसटी बसमध्ये चढणे अथवा उतरण्यासाठी १० किलोमीटर अंतरावर वाघोली अथवा शिक्रापूरला जावे लागत असे, तसेच ज्यादा तिकीटदरासह अधिकच्या प्रवासाचा भुर्दंडही प्रवाशांना सोसावा लागत असल्याने ज्येष्ठ नागरीक व रुग्णांची होणारी कुचंबणाही टळणार आहे. तसेच प्रवासी, कामगार, विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण, व्यापारी यासह सर्वच प्रवाशांना दिलासा मिळाला असल्याचे सरपंच संदीप ढेरंगे यांनी सांगितले.