सिद्धटेक (ता. कर्जत) येथे ज्ञानोबा माऊली..तुकाराम या जयघोषात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी ३७५ व्या वैकुंठगमन सोहळ्याचे आयोजन सिद्धटेक (ता. कर्जत) येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. हा सोहळा संत तुकाराम महाराजांच्या देहू नगरीतील संदेश आणि भक्तीचा गौरव करणाऱ्या सोहळ्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, संगीत गाथा पारायण आणि दिंडी सोहळा यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय झाला होता. जणू काही देहूनगरीच भीमातिरी अवतरली आहे, असा भास होत होता.

२३ ते ३० मार्च दरम्यान ३७५ व्या सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ज्ञानेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक कार्यक्रम पार पडले.सोहळ्यात ज्ञानेश्वर महाराज कदम यांनी तुकाराम महाराज जीवनचरित्र कथा अत्यंत भावयुक्त व श्रवणीय विवरण केले. या सप्ताहात देवराम महाराज गायकवाड, महादेव महाराज राऊत, बाळासाहेब महाराज देहूकर, केशव महाराज उखळीकर, जयवंत महाराज बोधले, बंडातात्या कराडकर, चैतन्य महाराज दैगलुरकर, प्रकाश महाराज जंजिरे यांची कीर्तने झाली. सोहळ्या निमित्त भंडारा डोंगर येथून तुकोबाराय यांच्या पवित्र पादुका हेलिकॉप्टरने सिद्धटेक येथे आणण्यात आल्या होत्या. सोहळ्याच्या सांगता कदम महाराज यांच्या काल्याच्या कीर्तन झाली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (पवार गट) शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार नीलेश लंके, आमदार जितेंद्र आव्हाड, रोहीत पवार, विक्रमसिंह पाचपुते, माजी आमदार रमेश थोरात, विलास लांडे, भाजपचे नेते वासुदेव काळे, देहू संस्थानचे विश्वस्त, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी आणि स्थानिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत तुकाराम महाराज वैकुंठगमनानिमित्त आयोजित त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळ्यातून त्यांच्या जीवनकार्याचा आणि भक्तीचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्थानिक प्रशासनानेही या सोहळ्यासाठी योग्य ती व्यवस्था केली होती. भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.