कोरेगाव भीमा दि. २ मार्च
वढू बुद्रुक (ता.शिरूर) भारताला गौरवास्पद व अभिमान वाटेल असे जागतिक दर्जाचे शंभू छत्रपतींचे स्मारक वढू – तुळापुर येथे साकारत असताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या रक्तदान महायज्ञामध्ये पाच हजारापेक्षा जास्त शंभू भक्तांनी रक्तदान करून शंभू छत्रपतींच्या समाधीवर खऱ्या अर्थाने रक्ताभिषेक करण्यात आला असल्याचे अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले.
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण होण्यासाठी बलिदान मासाच्या प्रारंभी श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील शंभूराजांच्या समाधीस्थळावर शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान व वढू बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने गेल्या चार वर्षापासून रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी रक्तदान महायज्ञामध्ये पाच हजार पाचशे एकोणव्वद शंभूभक्तांनी रक्तदान करुन शंभूछत्रपतींच्या समाधीवर रक्ताभिषेक करुन सामाजीक कर्तव्यही बजावल्याचे असल्याचे शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या ३३६ व्या बलिदान मासाच्या निमित्ताने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुणे जिल्ह्याच्या वतीने बलिदान मासाची सुरुवात म्हणून फाल्गुन शुध्द प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या एक महिन्याच्या कालावधीत पुणे जिल्ह्यासह राज्यभरात बलिदान मासाची सुरुवात झाली आहे. धर्मवीर शंभूराजांचे स्मरण म्हणून शेकडो शंभूभक्त धारकरी भीमा नदिच्या साक्षीने मुंडन करुन बलिदान मासाची सुरुवात शंभूराजांच्या समाधीस्थळावरुन करतात. यावर्षी शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे धारकरी व धर्मभक्त दि. २ मार्च रोजी समाधीस्थळावर नतमस्तक होत रक्तदान शिबीरास सुरुवात झाली. यावेळी पुणे जिल्ह्यासह विविध जिल्ह्यातून शंभू भक्त उपस्थित होते. आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून देव देश धर्म रक्षणाचेकर्तव्य बजावलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या बलीदानाची जाणीव म्हणून रक्तदान केल्याची भावना या प्रसंगी शंभू भक्तांनी व्यक्त केली. यावेळी पुणे सर्जिकल इन्स्टिट्युट, तर्पण ब्लड सेंटर, अक्षय ब्लड बँक , चाकण ब्लड बँक या चार रक्त पेढ्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र, छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा व ‘मृत्युंजय अमावस्या’ पुस्तक भेट देण्यात आले. यावेळी सर्व शंभूभक्त व रक्तदात्यांची भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानच्या वतीने २०२१ साली रक्तदान महायज्ञाची सुरुवात झाली व त्या वर्षी ३७२ , २०२२ साली १०५६, २०२३ साली २१४२ तर २०२४ ला ३०२० रक्तदात्यांनी तर यावर्षी ५५८९ रक्तदात्यांनी रक्तदान करुन शंभूछत्रपतींच्या समाधीवर नतमस्तक झाले असुन पुढिल वर्षी २२ फेब्रुवारी रोजी होणा-या रक्तदान शिबीरामध्ये सात हजार रक्तदान करण्याचा संकल्प शिवप्रतिष्ठानच्या वतीने यावेळी सोडण्यात आला.
बलिदान मास कसा पाळला जातो – भीमा नदीकिनारी मुंडण करून बलिदान मासास सुरुवात होते. बलिदान मासामध्ये महिनाभर चप्पल न घालणे, चहासह आवडीचे, गोडधोड पदार्थ वर्ज्य करणे, आनंदाच्या कार्यक्रमात सहभागी न होणे, मनोरंजनाचे कार्यक्रमाचे आयोजन न करणे आदी गोष्टी पाळून समाधी स्थळी नियमितपणे श्लोक पठण करण्यात येते.
श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या ३३६ व्या बलिदान मासाच्या निमित्ताने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वतीने रक्तदान महायज्ञात रक्तदात्यास शंभूप्रतिमा देताना कार्यकर्ते.