शिरूर – शिरूर बसस्थानकावर पर्समधून ८ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून पळ काढणाऱ्या दोन महिला चोरट्यांना शिरूर पोलिसांनी अटक केली आहे. चोरी गेलेले सर्व सोनं हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही घटना ११ मे रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडली. रूपाली अनिल काळेल (रा. त्रिमूर्ती नगर, बारामती) या आपल्या मुलगी व भाचीसह एसटीने बारामतीला जात असताना, शिरूर बसस्थानकात त्यांची पर्स चोरीला गेली. त्यामध्ये ६.५ तोळ्यांचे सोन्याचे गंठण किंमत ₹३,९०,००० आणि १.३ तोळ्यांचे झुबे किंमत ₹७८,००० असे एकूण ₹४,६८,००० किंमतीचे दागिने होते.
या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले. शिरूर ते श्रीरामपूरपर्यंत सुमारे १०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून, आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोन महिला आरोपींना ओळखण्यात आले.
पोलिसांनी श्रीरामपूर (जि. अहमदनगर) येथून मनिषा विजय कसबे व शोभा शंकर दामोदर या दोन महिलांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरी केलेले सर्व सोनं पोलिसांनी जप्त केलं आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अविनाश शिळीमकर,पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन संदेश केंजळे, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण पथकाचे पोलीस हवालदार तुषार पंधारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजु मोमीन व शिरूर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोसई शुभम चव्हाण, पोसई दिलीप पवार पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, महीला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, महीला पोलीस अंमलदार मोनिका वाघमारे, पोलीस अमंलदार नितेश थोरात, विजय शिंदे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील, सचिन भोई, निखील रावडे, निरज पिसाळ तसेच शिरूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.