शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पी.एम.श्री. जिल्हा परिषद शाळेत नियोसिम इंडस्ट्री लिमिटेड, सणसवाडीच्या सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमात एच.आर. ऍडव्होकेट स्वप्निल जठार आणि त्यांच्या सीएसआर फंड विभागातील सहकारी डॉ. श्रीकृष्ण खडे, राहुल सोनार, सुनील मुंडलिक, अजित सिंग यांनी सहभाग घेतला.
शाळेला पॅनल बोर्ड, लायब्ररी स्टँड, नोटीस बोर्ड इत्यादी शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले. या योगदानाबद्दल नियोसिम इंडस्ट्री लिमिटेडच्या पदाधिकाऱ्यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, मुख्याध्यापिका शिंदे मॅडम, शालेय व्यवस्थापन समितीचे तज्ज्ञ संचालक नवनाथ सासवडे तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. सरपंच रमेश गडदे यांनी शाळेची विद्यार्थी संख्या आणि विविध स्पर्धांमधील यशाबद्दल माहिती दिली. त्यांनी भविष्यात विद्यार्थ्यांसाठी वर्गखोल्या आणि खेळण्यासाठी मॅट्स उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
नवनाथ सासवडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टाकळकर सर यांनी केले, आणि मुख्याध्यापिका शिंदे मॅडम यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.