शिक्रापूर (ता.शिरूर) येथील एसटी स्टँड परिसरात चार-पाच दिवसांपासून भटकणाऱ्या निराधार वृद्धाला शिक्रापूर समस्या आणि उपाय ग्रुपच्या सदस्यांनी आणि सरपंच रमेश गडदे यांनी मायेचा आधार दिला. हिवाळ्याच्या कडाक्याच्या थंडीत असाहाय्य अवस्थेत असलेल्या या वृद्धाची विचारपूस केल्यानंतर त्यांना कुठलाही आधार नसल्याचे समोर आले.यावेळी आदर्श सरपंच रमेश गडदे व समस्या व उपाय ग्रुपच्या सदस्यांनी वृद्धाला सणसवाडी येथील माहेर संस्थेत दाखल करत माणुसकीचे दर्शन घडवल्याने शिक्रापूर परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे
मागील चारपाच दिवसांपासून हाडे गोठवणाऱ्या थंडीत वयोवृध्द बाबा एकटेच फिरताना दिसत असल्याने शिक्रापूर समस्या आणि उपाय ग्रुपच्या सदस्यांनी वृद्धाशी संवाद साधून त्यांची परिस्थिती समजावून घेतली. त्यानंतर सरपंच रमेश गडदे यांना या घटनेची माहिती दिली. गडदे यांनी तातडीने एसटी स्टँड येथे तातडीने येत वृद्ध बाबांना आपल्या गाडीतून तळेगाव ढमढेरे येथील शासकीय रुग्णालयात नेले. त्यांच्या आरोग्य तपासणीनंतर वृद्ध बाबांना समस्या व उपाय ग्रुपच्या सदस्यांसह माहेर संस्थेत दाखल केले.

माहेर संस्थेत दाखल करताना वृद्धांनी भरल्या अंतःकरणाने गडदे आणि समस्या-उपाय ग्रुपच्या सदस्यांचे आभार मानले. त्यांच्या डोळ्यांतून कृतज्ञतेचे भाव दिसत होते, तर सरपंच गडदे आणि ग्रुप सदस्यांच्या मनात समाधानाचे भाव उमटले.
समस्या-उपाय ग्रुपचे काम कौतुकास्पद – शिक्रापूर समस्या आणि उपाय ग्रुप पर्यावरण, स्वच्छता आणि जनजागृतीसोबत माणुसकीचा वारसा जपत आहे. या घटनेने त्यांच्या सामाजिक कार्याचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
ही माणुसकीची जाणिव ठेवत केलेले काम सर्वांना प्रेरणा ठरले आहे. आदर्श सरपंच रमेश गडदे आणि ग्रुपच्या सदस्यांच्या या माणुसकीच्या कार्याचे शिक्रापूर परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.