ज्ञानेश्वर माउली, ज्ञानराज माउली तुकाराम… असा संजीवन सोहळ्याच्या कीर्तनातील जयघोष… दुपारचे १२ वाजले आणि घंटानाद.. समाधीवर फुलांची पुष्पवृष्टी… संत नामदेव महाराज व माउलींची भेट आणि असंख्य भाविकांचे पाणावलेले डोळे… अशा भावपूर्ण वातावरणात माउलींचा ७२८वा संजीवन समाधी सोहळा ‘माउली – माउलीं’च्या जयघोषात पार पडला. संजीवन सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी हा सोहळा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवत ‘श्रीं’चे दर्शन घेतले.
“तीन वेळा जोडिलें करकमळ, झांकियेलें डोळे ज्ञानदेवें…”. – तीन वेळा करकमळ जोडून डोळे मिटून ब्रह्मलीन झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२८व्या संजीवन समाधी सोहळ्याचा भक्तिमय उत्सव मोठ्या उत्साहाने आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. आळंदीतील इंद्रायणी तीरावर लाखो भाविकांच्या उपस्थितीत “माऊली, माऊली” च्या जयघोषात हा सोहळा साजरा झाला.
पहाटे ३ वाजता प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप यांच्या हस्ते समाधीस्थळी पवमान अभिषेक करण्यात आला. सकाळी ५ वाजता भाविकांसाठी महापूजा तर ७ वाजता विणा मंडपात कीर्तनसेवा आयोजित करण्यात आली. नामदास महाराजांच्या कीर्तनाने समाधी सोहळ्याचा प्रसंग उलगडताना भाविकांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.
दुपारचा महोत्सव आणि पुष्पवृष्टी- दुपारी १२ वाजता घंटानाद आणि समाधीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यानंतर भक्तांनी आरती करून माऊलींच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले.
या भक्तिमय उत्सवाला माजी मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय जाधव, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, आणि विश्वस्त राजेंद्र उमाप यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
वारकऱ्यांची परतीची वाटचाल- शनिवारी (दि. २३) सुरू झालेल्या या सोहळ्यात राज्यभरातून ५ लाखांहून अधिक वारकरी आळंदीत दाखल झाले होते. समाधी सोहळ्यानंतर भाविकांनी समाधीस्थळाला निरोप दिला आणि गावी परतीचा प्रवास सुरू केला.
वैष्णवांचा भक्तिमय अनुभव – वारकरी भाविकांनी मंदिरात २४ तास खुले दर्शन घेतले. यावेळी पोलीस बंदोबस्त आणि व्यवस्थापन समितीच्या नियोजनामुळे उत्सव निर्विघ्नपणे पार पडला. “माऊली माऊली” च्या जयघोषात पार पडलेला हा सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला.