सणसवाडी (ता. शिरूर), ता. २० मे : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील सणसवाडी मुख्य चौकात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे एक मोठे होर्डिंग कोसळले. सुमारे ३० फूट लांब, ३० फूट रुंद व ३० फूट उंचीचे हे अवाढव्य होर्डिंग महामार्गाच्या दिशेने कोसळले. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सुदैवाने, होर्डिंगच्या खाली असलेल्या दुकानांतील नागरिक वेळेवर बाजूला गेल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, होर्डिंगखाली पार्क केलेल्या सात ते आठ दुचाक्यांचे मोठे नुकसान झाले. तर विजेच्या तारांचेही नुकसान झाले.
ही घटना घडली त्याच परिसरात यापूर्वीच शिक्रापूर पोलिसांनी १४ मे रोजी हद्दीतील ३९ ग्रामपंचायतींना सूचना देऊन गावांतील धोकादायक होर्डिंग्स तातडीने काढून टाकण्याचे आदेश दिले होते. तरीदेखील अशी दुर्घटना घडल्याने पोलीस आणि ग्रामप्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.
या घटनेनंतर ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड यांनी संबंधितांना नोटिसा बजावल्याची माहिती दिली. तसेच या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते का, आणि जर झाले असेल तर तरीही अपघात का झाला? या प्रश्नांची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे तपासासाठी पत्र पाठवले जाणार आहे.
या घटनेबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणसवाडी चौकात मुकेश भुजबळ (रा. सणसवाडी) यांच्या मालकीच्या जागेवर मयुर कैलास गायकवाड (रा. डोंगरगाव, ता. हवेली) यांच्या मालकीचे हे होर्डिंग उभारण्यात आले होते. अपघातानंतर पोलिस आणि ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
या प्रकरणी नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशी अजबाबदार कृती केल्याबद्दल जागा मालक मुकेश भुजबळ व होर्डिंग मालक मयुर गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, फौजदार महेश डोंगरे अधिक तपास करत आहेत.
भर पावसात पोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचारी कर्तव्य बजावतात – पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना सणसवाडी चौकातील अवाढव्य हार्डिंग भर पावसात कोसळल्याचे कळताच त्यांनी घटना स्थळी धाव घेत संबंधित हार्डिंग तातडीने क्रेनच्या सहाय्याने हटवले यासाठी भर पावसात पोलिस कर्मचारी काम करत होते.ही वेळ सणसवाडी,शिक्रापूर,रांजणगाव व कारेगाव येथील कंपनी कामगार घरी परतण्याची व दुसरी शिफ्ट सुरू होण्याची असल्याने जाणारे व येणारे कामगार आणि प्रवासी अशी मोठ्या वाहतुकीची वेळ असतानाही पोलिस प्रशासनाने वाहनांची वाहतूक कोंडी होऊ न देता नियोजनबद्ध मदतकार्य केले.यामुळे नागरिकांनी पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड व पोलिस यंत्रणेचे आभार मानले.