महिलेवर सव्वादोन फुटांचा एक वार तर ऑपरेशन साठी २२ हजारांचा लागला दोरा
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना रविवारी घडली होती. भावकीतीलच ३६ वर्षांच्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या वर्षांच्या तरुणाने नकारानंतर तिच्या अंगावरती कटरने वार केले.यामुळे महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या अंगावर एक वार सव्वादोन फुटाचा असून शरीरावर ठीकठीकानी वार झालेले असून गोधडी शिवल्यागत डॉक्टरांनी महिलेच्या अंगावर टाके घातले असून होणाऱ्या त्रासामुळे महिलेला रडता येत नाही की सहन करता येत जिवंतपणी मरण यातना सहन कराव्या लागत असून झालेल्या या प्रकाराने संभाजीनगर हादरले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे. बलात्काराचा प्रयत्न केल्यानंतर ३६ वर्षीय विवाहितेने आरडाओरडा सुरू केल्याने विकृताने तिच्यावरती वार केले आहेत. तिचा चेहराही विद्रूप करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. रविवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे. अभिषेक तात्याराव नवपुते (१९, रा. घारदोन) असे विकृताचे नाव आहे, चिकलठाणा पोलिसांनी त्याला मंगळवारी अटक केली आहे.
जखमी महिलेवर तब्बल २८० टाके घालावे लागले असून सव्वादोन फुटांचा एक वार केला आहे. अत्यंत भयंकर वेदना सहन करीत ही महिला एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
अशी घडली घटना –
महिला शेतात काम करत असताना अभिषेकचा मला फोन आला. तो म्हणाला की, एक तर तू माझ्याबरोबर झोप, नाही तर तुझ्या जावेशी माझे जुळवून दे. महिलेनं फोन कट केला. त्यानंतर संध्याकाळी महिला शेतातलं काम संपवून पांदीच्या रस्त्याने एकटीच जात असताना अचानक पाठीमागून येऊन त्यानं वेणी खेचली आणि डोके दगडावर आपटलं. महिलेला काही कळायच्या आतच त्यानं पहिल्यांदा कटरनं चेहऱ्यावर वार केला. महिला ओरडायचा प्रयत्न केला तर त्यानं गळ्यावरच वार केला आणि लगेच सपासप सगळीकडे वार सुरू केले. पाठीवरचा वार तर एवढा भयंकर होता की मानेपासून मांडीपर्यंत चिरून काढला, अशा विकृत मानसिकतेच्या नराधम आरोपीपासून महिलेने बचावाचा प्रयत्न केला, पण त्याने तिच्यावरती वार करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.
काही घडलेच नाही असा आविर्भावात गावात आरोपी फिरला –
अभिषेक तात्याराव नवपुते असं या आरोपीचं नाव आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात काही घडलेच नाही अशा आविर्भावात नराधम आरोपी फिरत होता. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
डॉक्टरांना गोधडीवानी अंग शिवावं लागलं तर २२ हजारांचा लागला दोरा –
पिडितेला होणाऱ्या यातना, शारीरीक आणि मानसिक त्रास हे एकून अंगावर काटा उभा राहतो. माझ्यावर त्यानं इतके वार केले आहेत की, डॉक्टरला गोधडीवानी माझं अंग शिवावं लागलं. २८० टाके शिवण्यासाठी नुसता दोराच २२ हजार रुपयांचा लागला आहे. एकही अवयव असा नाहीये की जिथे फाडलेलं नाहीये. त्या घावांमुळे सगळ्या अंगातच आगडोंब उठला आहे. या यातना सहन होत नाही, पण रडताही येत नाही. कारण, डोळ्यातून आलेलं पाणी टाके शिवलेल्या जखमेला लागलं तर आणखीच आग मारते. आता मी करू तरी काय ? असं ती पिडित महिला म्हणते.
सव्वादोन फुटांचा एक वार –
नराधमाने महिलेवर वार केला यामध्ये मानेपासून ते कमरेपर्यंत सव्वादोन फुटांचा एक वार आहे. भयंकर वेदना सहन करत ही महिला एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. घरातील परिस्थिती जेमतेम आहे. त्यांना ११ वर्षांची दोन मुलं आहेत. सासरप्रमाणेच त्यांच्या माहेरची परिस्थितीही हलाखीची आहे. पीडितेवर उपचार करण्यासाठी आता जो खर्च येईल त्यासाठी त्यांकडे पुरेसे पैसेही नाहीत.