रांजणगाव गणपती (ता. शिरूर) — “मानवी जीवनात जोपासले जाणारे छंद व अंगभूत कला या खऱ्या अर्थाने परिसाप्रमाणे आहेत. त्यांचा उपयोग करून आपण अर्थपूर्ण जीवन जगू शकतो,” असे मत अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था पुणेचे अध्यक्ष माधव राजगुरू यांनी व्यक्त केले. ते संस्थेच्या शिरूर शाखेच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने शिरूर शाखेच्या वतीने तालुकास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील ७६ शाळांनी सहभाग घेतला. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
स्वरा भुजबळ, आराध्या गावडे, नियती कटारिया, अधिरा शेळके, शौर्य कळसकर, आरुष चव्हाण, तेजस्विनी शिंदे, स्वरांजली भागवत, अन्वी गायकवाड, श्रेयश शिंदे यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमासाठी बालकुमार साहित्य संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, ज्येष्ठ समाज प्रबोधनकार उत्तम भोंडवे, शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल पलांडे, म.सा.प. शिरूरचे अध्यक्ष मनोहर परदेशी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिवदुर्ग प्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक उमेश धुमाळ यांचा गडकोट किल्ले संवर्धन व पर्यावरण जतनासाठी विशेष मोहिम व किरण अरगडे यांचा विद्यार्थ्यांसाठी लाठीकाठी व योग प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त केल्याची शिरूर शाखेचे अध्यक्ष राहुल चातुर यांनी माहिती दिली. या वेळी म.सा.प. शिरूरचे कार्याध्यक्ष कुंडलिक कदम, संजीव मांढरे, गुरुनाथ पाटील यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.कवी मनोहर परदेशी व बालकवी अनिष्का पऱ्हाड यांच्या कवितांनी कार्यक्रमाला रंगत आणली. युवा उद्योजक कवी मयूर करंजे यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.