पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यात एका आजोबांनी आपल्या नातवांसाठी चक्क महाराष्ट्रातील सगळ्यात महागडा तमाशा बूक केल्याची घटना समोर आली आहे. नातवांच्या वाढदिवसाचा उपक्रम म्हणून त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.पण अशाप्रकारे वाढदिवासाठी आजोबांनी तमाशा बूक केल्यानं परिसरात एकच चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी तमाशासाठी दीड लाख रुपये खर्च केल्याने आजोबांच्या या दिलदारपणाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
माऊली वाघोले पाटील असं तमाशा बूक करणाऱ्या आजोबांचं नाव आहे. ते दौंड तालुक्यातील देलवडी गावातील रहिवासी आहेत. नातू तन्मय वाघोले आणि चिन्मय वाघोले यांच्या वाढदिवसानिमित्त माऊली वाघोले यांनी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रघुवीर खेडेकर हा लोकनाट्य तमाशा मनोरंजन म्हणून आयोजित केला. यासाठी माऊली वाघोले यांनी तब्बल एक लाख ४० हजार रुपये मोजले आहेत. या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. माजी आमदार थोरात यांनी तमाशाच्या व्यासपीठावर जाऊन चिमुकल्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर लोकनाट्य तमाशातील तब्बल १०० कलावंतांनी आपल्या सादरीकरणातून चिमुकल्यांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या. लोकनाट्य तमाशा आतापर्यंत गावोगावच्या यात्रेच्या निमित्ताने होत असतो असा पायंडा आहे. परंतु पहिल्यांदाच वाढदिवसाच्या निमित्ताने हा तमाशा होत असल्याने अनेक तमाशा शौकिनांनी गर्दी केली होती.
याबाबत अधिक माहिती नुसार, चार वर्षापूर्वी नातवांच्या वाढदिवसानिमित्त आजोबांनी इंदुरीकर महाराजांचं किर्तन ठेवलं होतं. तसेच चिमुकल्यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान, शैक्षणिक साहित्य वाटप असे उपक्रम देखील घेतले असून यावेळी वेगळा प्रयत्न केला आहे. तमाशा लोककला आहे. ती कला जोपासण्याचा प्रयत्न याद्वारे करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.