Air India Flight Crash: लंडनला निघालेल्या डॉक्टर दाम्पत्याचा ३ मुलांसह करून अंत

Swarajyatimesnews

महिनाभरापूर्वीच सिलेक्शन, स्वप्न अधुरे राहिले!

अहमदाबाद,: १३ जून २०२५– अवघ्या महिन्याभरापूर्वीच लंडनमधील हॉस्पिटलमध्ये नोकरीसाठी निवड झालेल्या डॉ. प्रतीक जोशी आणि त्यांच्या पत्नी डॉ. कौनी व्यास तसेच त्यांच्या तीन चिमुकल्या मुलांचा अहमदाबाद विमानतळावर गुरुवारी (१२ जून २०२५ रोजी) झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लंडनमध्ये नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचे या कुटुंबाचे स्वप्न होते, मात्र नियतीने त्यांचा घात केला.

लंडनच्या स्वप्नपूर्तीची कहाणी, ठरली अखेरची यात्रा: बांसवाडा जिल्ह्यातील प्रतिष्ठित जोशी कुटुंब हे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होते. डॉ. प्रतीक जोशी आणि डॉ. कौनी व्यास हे दोघेही डॉक्टर होते आणि त्यांनी उदयपूरच्या पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये एकत्र काम केले होते. डॉ. प्रतीक जोशी यांना महिन्याभरापूर्वी लंडनमधील एका हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली होती आणि ते तिथे स्थायिक होण्यासाठी गेले होते. पती परदेशी गेल्यानंतर डॉ. कौनी व्यास त्यांच्या तीन मुलांसह भारतातच होत्या आणि लवकरच पतीकडे जाण्यासाठी आतुर होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांनाही लंडनमधील त्याच हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली आणि संपूर्ण कुटुंब एकत्र लंडनला जाण्यासाठी सज्ज झाले.

गुरुवारी दुपारी एअर इंडियाच्या विमानाने डॉ. प्रतीक, डॉ. कौनी आणि त्यांची मुलगी नियारा, मुलगे नकुल व प्रद्युत हे लंडनकडे रवाना होत होते. त्यांनी सामान पॅक केले, नातेवाईकांचा निरोप घेतला आणि नव्या आशेने विमानात चढले. मात्र, उड्डाण होताच विमान कोसळले आणि त्यांच्या स्वप्नांचा दुर्दैवी अंत झाला.

अहमदाबाद विमानतळावरील थरारक दुर्घटना: ही हृदयद्रावक दुर्घटना अहमदाबाद विमानतळावर गुरुवारी दुपारी १:३९ वाजता घडली. विमान टेकऑफ होताच, एटीसीला (एअर ट्रॅफिक कंट्रोल) ‘मेडे’ (MAYDAY) चा कॉल आला आणि त्यानंतर विमानाचा संपर्क तुटला. काही क्षणातच विमान कोसळले. विमानात एकूण २४२ प्रवासी होते – ज्यात २ पायलट, १० क्रू मेंबर्स आणि २३० प्रवासी होते. सध्या एक प्रवासी जिवंत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

बांसवाडा जिल्ह्यावर शोककळा: जोशी कुटुंबाच्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण बांसवाडा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. डॉ. प्रतीक जोशी यांच्या निवासस्थानी शेकडो लोकांनी गर्दी केली असून, नातेवाईकांचा एकच आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. एकाच वेळी संपूर्ण कुटुंब गमावल्याचे दुःख त्यांना सहन होत नाहीये. डॉ. प्रतीक यांचे वडील स्वतः डॉक्टर आहेत, ते कसाबसा धीर धरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आई या धक्क्याने बोलूही शकत नाहीत, फक्त रडत आहेत.

प्रशासनाने जोशी कुटुंबीयांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. व्यावसायिक यशाबरोबरच हे कुटुंब सामाजिक कार्यातही सक्रिय होते. मात्र, नियतीने त्यांचे लंडनमध्ये स्थायिक होण्याचे स्वप्न अधुरे ठेवून, संपूर्ण कुटुंब हिरावून घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!