सोलापूर जिल्ह्यातील सर्व कार्यालयांत महावितरणची स्वच्छता
सोलापूर – महाराष्ट्र शासनाच्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान २०२४ अंतर्गत, १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात आला. याच उपक्रमांतर्गत महावितरणने सोलापूर जिल्ह्यातील सर्व कार्यालयांमध्ये स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश दिला.
महावितरणच्या सोलापूर जिल्ह्यात एक मंडल, ५ विभाग, २६ उपविभाग, आणि १२५ शाखा कार्यालये आहेत. बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता अंकुश नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्या नेतृत्वात २ ऑक्टोबर रोजी सर्व कार्यालयांत स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. माने यांनी सर्व अभियंते, तांत्रिक व अतांत्रिक कर्मचाऱ्यांना एकत्र आणून, “आपण ज्या कार्यालयात काम करतो ते सर्वांनी मिळून स्वच्छ करूया” हा संदेश दिला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कार्यालयांना सुटी असतानाही, सर्व वीज कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियानात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी लवकरच कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेला सुरुवात केली. कार्यालयातील कचरा साफ करून, परिसरातील गवत आणि घाण काढून संपूर्ण कार्यालयांची स्वच्छता करण्यात आली. उपकेंद्रांच्या शाखांमध्येही स्वच्छता करण्यात आली.
सोलापूर, पंढरपूर, बार्शी, अकलूज, सांगोला, अक्कलकोट, करमाळा, जेऊर, आणि टेंभूर्णी आदी ठिकाणीही हे अभियान यशस्वीपणे राबवण्यात आले. अधीक्षक अभियंता सुनील माने, कार्यकारी अभियंते साईप्रकाश अरळी, रमेश राठोड, आशीष मेहता, विजय पाटील, सुरेश कुऱ्हाडे, आणि अण्णासाहेब काळे यांनी स्वतःहून स्वच्छतेला सुरुवात करून कर्मचाऱ्यांचे नेतृत्व केले.महावितरणच्या या स्वच्छता उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.