पुणे: लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी (१९ ऑगस्ट) सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. एका तरुणाने ठाणे अंमलदार कक्षात स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी २५ वर्षीय सौरभ पोटभरे (रा. पेरणे फाटा) या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना सायंकाळी पावणे आठच्या सुमारास घडली. सौरभ पोटभरे पोलीस स्टेशनमध्ये आला आणि त्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्याच्या हातात असलेल्या बाटलीत त्याने डिझेल आणले होते. अचानकच त्याने ते डिझेल स्वतःच्या अंगावर ओतले आणि माचीस काढून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
या वेळी उपस्थित असलेले ठाणे अंमलदार मच्छिंद्र वाळके यांनी तात्काळ हस्तक्षेप करत हा प्रकार थांबवला. यामुळे पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी सौरभची वैद्यकीय तपासणी केली असता तो दारूच्या नशेत असल्याचे समोर आले.
या घटनेनंतर मच्छिंद्र वाळके यांच्या फिर्यादीवरून सौरभ पोटभरे याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८७ आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतःचे आणि इतरांचे जीवन धोक्यात आणल्याबद्दल त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.