अटीतटीच्या लढतीत अनिकेत गव्हाणे विजयी; ‘भरत’ बाणाने भेदले सत्तेचे लक्ष्य, ‘बबड्या’ ठरला गावचा कारभारी
कोरेगाव भीमा (ता. शिरूर): शिरूर तालुक्याचे राजकीय प्रवेशद्वार असलेल्या ऐतिहासिक कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीने तालुक्याच्या राजकारणाची सर्व गणितेच बदलून टाकली आहेत. राजकारणातील ‘जादुगार’ समजल्या जाणाऱ्या किंगमेकरचे सर्व डावपेच धुळीस मिळवत, अनिकेत साहेबराव गव्हाणे यांनी ९ विरुद्ध ६ मतांनी सरपंचपदाची माळ आपल्या गळ्यात पाडली. या विजयाने गावच्या राजकारणात ‘भावकी’ आणि ‘वाड्या’च्या अस्मितेचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
राजकीय जादुगाराची कोंडी; ‘भरत’ बाण अचूक! : मागील निवडणुकीत अत्यंत सावधगिरीने विरोधातील पॅनलला धोबीपछाड देणाऱ्या आणि सध्या स्वतःला ‘किंगमेकर’ भूमिकेत असणाऱ्या राजकीय जादुगार म्हणून परिचित असणाऱ्या डावाला प्रतिडाव टाकत गव्हाणे गटाने ही निवडणूक जिंकली. “राजकारणात कायम दुसऱ्यांच्या तालावर नाचण्यापेक्षा, आपल्यातल्याच एकाला मोठे करू” हा विचार प्रभावी ठरला. या परिवर्तनासाठी वापरलेला ‘भरत’ बाण थेट निशाण्यावर लागल्याने राजकीय जादुगाराची चांगलीच कोंडी झाली असून, नक्की गणित कुठे बिघडले याचा शोध आता पराभूत गटाकडून घेतला जात आहे.
‘नको लबाड्या की कुरघोड्या, सरपंच करू आपला बबड्या’ : एकेकाळी शिरूरच्या राजकारणात ‘गव्हाणे पाटील’ या नावाचा मोठा दबदबा होता. मात्र, गेल्या काही वर्षांत ही भावकी राजकारणात उपेक्षित राहिल्याची भावना अनेकांच्या मनात होती. याच खदखदेतून “आता नको लबाड्या की कुरघोड्या, सरपंच करू आपला बबड्या (अनिकेत गव्हाणे)” हा नवा मंत्र उदयास आला. भावकीने एकमेकांमधील मनभेद बाजूला ठेवून गव्हाणे वाड्याच्या स्वाभिमानासाठी ‘ग’ फॅक्टर (गव्हाणे) एकत्र आणला आणि अशक्य वाटणारा अनमोल विजयश्री खेचून आणला. आळी फळी एकत्र केली.
आप्पा, मला माफ करा, माझं चुकलं… आता मला पद नको, फक्त एकी हवी!” : “राजकीय सोयीसाठी जर परके एकत्र येऊ शकतात, तर रक्ताची ‘ग’ भावकी का नाही?” या एकाच विचाराने विखुरलेली मने एकत्र आली. या परिवर्तना दरम्यान एक अत्यंत भावूक प्रसंग घडला. “आप्पा, मला माफ करा, माझं चुकलं… आता मला पद नको, फक्त एकी हवी!” अशा शब्दांत एकाच्या भावनांचा बांध फुटला आणि आसवांनी जुन्या संघर्षाला वाट मोकळी करून दिली. मनातील हे भेद सरताच ‘गावकी’ आणि ‘भावकी’ची वज्रमुठ आवळली गेली.
वाड्याच्या स्वाभिमानासाठी अहंकाराचा त्याग करत सांडलेल्या त्या आसवांनीच विजयाचा आनंद द्विगुणित केला. हा केवळ एका सरपंचपदाचा विजय नसून, भविष्यातील राजकारणाला निर्णायक वळण देणाऱ्या ‘अनमोल एकीचा’ विजय ठरला आहे.
आपण अगोदर एक होऊ, भावकीचे अन् वाड्याचे नाव सरपंचपदाला लावू : राजकारण डाव प्रतिडाव होत राहील पण अभूतपूर्व एकी साधण्याची हीच एकमेव संधी असून आता काहीही झाले तरी एक होऊ आपले आडनाव अन् आपल्या वाड्याचे नाव सरपंचपदाला लावू असा सूर लावला शेवटी भावकीची एकी आणि भविष्यातील राजकारणाची दिशा बदलण्यासाठी एक झाल्याचे बोलले जात आहे.
स्वप्नांचा चकनाचूर; राजेश ढेरंगेंची मेहनत व्यर्थ? : दुसरीकडे, महेश ढेरंगे यांना सरपंच करण्यासाठी त्यांचे बंधू राजेश ढेरंगे यांनी जीवाचे रान केले होते. वडील देवराम ढेरंगे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजेश ढेरंगे यांनी आपल्या सोज्वळ आणि दिलदार स्वभावाने सर्व राजकीय समीकरणे जुळवली होती. अशक्य वाटणारे शक्य झाले होते. राजकारणापलीकडे एकजुटीच्या भावनेला सहनभूतीची चांगलीच जोरदार टाळी देत श्री विठ्ठलाचे आशीर्वाद, श्री दत्त महाराजांची कृपा तर नामदेवांची अभंगवाणी एक सुरात रघुपती राजाराम पतीत पावन सीताराम हे भजन व आशीर्वाद दैवयोगाने चांगलेच प्रकाशमय झाले होते. महेश ढेरंगे यांनी सरपंच होण्याची औपचारिकता बाकी इतका विश्वास सर्वांना आला होता पण प्रत्यक्षात मतदान झाल्यावर अनेक वर्षांच्या स्वप्नाचा चक्काचूर झाला.
