नेत्रदिपक यशामुळे कस्तुरी मुसमाडेची शालेय व्यवस्थापन समिती व गावाच्यावतीने काढण्यात आली सवाद्य मिरवणूक
दिनांक २२ ऑगस्ट कोरेगाव भीमा (ता. शिरूर ) पुणे जिल्ह्यातील तब्बल तेरा हजार विद्यार्थ्यांमधून शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील कस्तुरी मुसमाडे हिने शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्य गुणवत्ता यादीत यश मिळविण्याबरोबरच अमेरिका मधील नासाच्या भेटीसाठी जिल्हा परिषदेने घेतलेल्या परीक्षेमधून निवड झाल्याने हे केवळ तिचे यश नसून हा तालुक्याचा गौरव असल्याची भावना तालुका गटविकास अधिकारी महेश डोके यांनी व्यक्त केली.
कस्तुरी मुसमाडे हिने पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्य गुणवत्ता यादीत अकरावा क्रमांक पटकवीला आहे. तसेच नासा भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तिची निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा कोरेगाव भिमा, शालेय व्यवस्थापन समिती व गावच्यावतीने सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात कस्तुरीचा व तिला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका जयमाला मिडगुले व बाबाजी सावंत या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी गटविकास अधिकारी महेश डोके व जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांच्या उपस्थितीत व व्यवस्थापन समितीचे गणेश गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सरपंच संदीप ढेरंगे, उपसरपंच सविता घावटे, माजी सरपंच अशोक काशीद, अमोल गव्हाणे, दत्तात्रय ढेरंगे, सदस्या मनीषा गव्हाणे, ग्रामपंचायत अधिकारी श्रीकांत वाव्हळ, समीर इनामदार, शंकर गव्हाणे, राजेंद्र गवदे, सोमनाथ राऊत, बाप्पू शिंदे, सुमिता गव्हाणे, नितीन गव्हाणे, विनोद साळुंके, संध्या कुंभार, केंद्रप्रमुख चंद्रकांत म्हाळस्कर, शाळेच्या मुख्याध्यापिका उषा भंडारे, तसेच परिसरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचलन सुरेश सातपुते तर आभार तुकाराम सातकर यांनी मानले.
प्राथमिक शिक्षण हे खऱ्या अर्थाने मातृभाषेतील शिक्षणातून या ठिकाणी जाती-धर्माला स्थान न देता भारतीय म्हणून एकीचे दर्शन केवळ जिल्हा परिषद शाळेतच पाहायला मिळते आणि बहुतांश शासकीय अधिकारी जिल्हा परिषद शाळेतूनच घडत असल्याने यापुढील काळात कस्तुरी मुसमाडे ही ही शासकीय अधिकारी होऊन दाखवेल –जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे
कोरेगाव भीमा प्राथमिक केंद्र शिष्यवृत्ती इतर स्पर्धा परीक्षा याबरोबरच नवोदय विद्यालय परीक्षा यामध्ये सातत्याने यश संपादन करत असल्याने व नासा संस्थेस जिल्ह्यातील २५ विद्यार्थ्यांमध्ये याच शाळेतील कस्तुरी मुसमाडे या विद्यार्थिनी ची निवड झाल्याने या शाळेसाठी तालुक्यातील औद्योगिक कारखान्यांतील सीएसआर फंडातून चार वर्ग खोल्या मोठा सभागृह व क्रीडांगणावर शेड उभारण्यासाठी तात्काळ निधी मिळवून देऊ असे आश्वासन गटविकास अधिकारी महेश डोके यांनी दिले.
जिल्हा परिषद शाळांमध्ये देण्यात आलेल्या टॅबलेट मधून मुलांना आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या वतीने ज्ञानरचनावली साहित्य टॅबलेट मध्ये समाविष्ट करण्यासाठी तरतूद करण्यात आली असून येथे काही दिवसात कोरेगाव भीमाचे विद्यार्थी टॅबलेट वर शिक्षण घेत अधिक प्रगती साधतील असा विश्वास ग्रामपंचायत अधिकारी श्रीकांत वाव्हळ यांनी व्यक्त केला
कस्तुरी मुसमाडे चा बारावीपर्यंतचा शिक्षणाचा प्रश्न निकाली – कस्तुरी मुसमाडे हिने नासामध्ये निवड झाल्याने गावच्या नावलौकिका त भर पडली असून तिच्या बारावीपर्यंतचा शिक्षणाचा खर्च कोरेगाव भीमाच्या ग्रामपंचायत सदस्या मनीषा गव्हाणे व भाजपचे संपत गव्हाणे यांनी उचलला आहे. त्याचबरोबर अशोक काशीद, दत्तात्रय ढेरंगे, संपत गव्हाणे, शंकर गव्हाणे, विनोद साळुंखे यांच्यासह मुख्याध्यापिका उषा सुरेश भंडारे यांनी निधी जमा करून तिच्या नावावर फिक्स डिपॉझिटही केले आहे.