कर्मचाऱ्यांना कपडे,मिठाई व डबल पगार तर अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांनाही दिवाळीनिमित्त मिठाई वाटप
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) – कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या वतीने दिवाळीनिमित्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी डबल पगार देत आनंदाची पर्वणी साजरी करण्यात आली आहे. सालाबादप्रमाणे कर्मचाऱ्यांना कपड्यांसह, दिवाळी मिठाईचे वाटप करण्यात आले असून, सप्टेंबर व ऑक्टोबर २०२४ चे वेतन तसेच दुहेरी बोनस मिळाल्याने त्यांच्या खात्यात एकूण रु. २०,८४,८६२/- जमा करण्यात आली.यामुळे कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त ग्राम पंचायतीचे आभार मानले.
ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला सरपंच संदीप ढेरंगे, माजी सरपंच विजय गव्हाणे, उपसरपंच सविता घावटे, ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे, मनीषा गव्हाणे, वंदना गव्हाणे, रेखा ढेरंगे तसेच ग्रामपंचायत अधिकारी श्रीकांत वाव्हळ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या दरम्यान, सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. याबरोबरच गावातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांनाही दिवाळीनिमित्त मिठाई देऊन सणाचा आनंद वाटला गेला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या मनोगतात ग्रामपंचायतीच्या या अनोख्या उपक्रमाचे स्वागत करत ग्रामपंचायतीचे आभार मानले. सरपंच संदीप ढेरंगे यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कामगिरीबद्दल कौतुक व्यक्त केले. तसेच, ग्रामपंचायतीच्या कामकाजातून उत्कृष्ट सेवा पुरवण्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.