समाजातील विकृत विचारसरणीला आळा घालण्यासाठी मुल्यसंस्कार आणि स्वसंरक्षण अभियानाची गरज – नितीन मोरे

Swarajyatimesnews

शिक्रापूर आणि चाकण येथे पार पडलेल्या सामूहिक सरस्वती पूजन व विद्यारंभ सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद.

शिक्रापूर, (ता. शिरूर) “समाजातील विकृत विचारसरणी दूर करण्यासाठी आणि अप्रिय घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी सुसंस्कारासोबतच स्वसंरक्षण तंत्राचे शिक्षण प्रत्येकापर्यंत पोहोचवणे अत्यावश्यक आहे,” असे मत नितीन मोरे यांनी व्यक्त केले. ते दिंडोरीप्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने आयोजित सामूहिक सरस्वती पूजन आणि विद्यारंभ सोहळ्यात बोलत होते.

मोरे यांनी या प्रसंगी समाजातील विकृतींवर मात करण्यासाठी शिवरायांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले. त्यांनी मूल्यसंस्कारांचे महत्त्व अधोरेखित करताना असे सांगितले की, “मुलांमध्ये भक्ती, संस्कार आणि स्वसंरक्षणाची भावना रुजवणे ही काळाची गरज आहे. घराघरातून शिवरायांचे विचार जपणारी पिढी घडवण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा.” असे आवाहन केले.

या सामूहिक सोहळ्यादरम्यान, शालेय विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सेवेकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सरस्वती मातेच्या पूजनातून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानार्जनाची भावना आणि सुसंस्कार रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दिंडोरीप्रणित श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या बालसंस्कार विभागातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात, ज्यामध्ये व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण जनजागृती, आणि गडकिल्ले संवर्धन या विषयांवर विशेष भर दिला जातो. या सोहळ्यातही मुलांना समाजाभिमुख करण्यासाठी विविध मार्गदर्शनपर कार्यक्रम राबवले गेले.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या कुसूम मांढरे पाटील, आबाराजे मांढरे पाटील, माजी सभापती मोनिका हरगुडे, शिक्रापूर सरपंच रमेश गडदे, उपसरपंच सारीका सासवडे, सदस्या वंदना भुजबळ, माजी सरपंच जयश्री भुजबळ, अमर करंजे, आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!