भारतीय जैन संघटना विद्यालय गुणवत्तेत जिल्ह्यात अव्वल

Swarajyatimesnews

वाघोली, ता. २४: पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग व पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या गुणवत्ता संवर्धन अभियानात वाघोली येथील भारतीय जैन संघटना विद्यालयाने १००० पेक्षा अधिक विद्यार्थी गटामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून आपले गुणवत्ता नेतृत्व सिद्ध केले आहे.

या अभियानात संपूर्ण जिल्ह्यातील तब्बल १५०० शाळांनी सहभाग घेतला होता. शाळांच्या भौतिक सुविधा, प्रशासन, अध्यापन प्रक्रिया व गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांची तपासणी करून विजेत्या शाळांची निवड करण्यात आली. या मूल्यांकनात भारतीय जैन संघटना विद्यालयाने आपली वेगळी छाप पाडली.

२४ एप्रिल रोजी गणेश कला क्रीडा मंच, पुणे येथे आयोजित गुणगौरव सोहळ्यात विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी, पर्यवेक्षक पांडुरंग पवार, उपप्राचार्य पोपटराव गेठे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जिल्हास्तर व तालुकास्तरावरील प्रथम क्रमांकाचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र स्वीकृत केले.

या गौरव सोहळ्यात शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, उपशिक्षणाधिकारी छाया महेंद्रकर, संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, शहर संघाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे व सचिव किशोर बोरसे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या यशाबद्दल बीजेएसचे संस्थापक आदरणीय शांतीलालजी मुथ्था, प्रबंध समितीचे अध्यक्ष विलास राठोड, शाळा समितीचे अध्यक्ष अरुण नाहर आणि प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंके यांनी प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करत विद्यालयाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या यशामुळे संपूर्ण विद्यालयात उत्साहाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अभियानातील विविध विभागप्रमुख राजेंद्र जायभाय, पूनम सिंह, वंदना बोडके, विष्णू देवडकर, संदीप लोणकर, रेश्मा शितोळे, स्मिता शिंदे, मारुती बोडके, विकास लोणकर व कीर्ती ढमाले यांनीही महत्वाचे योगदान दिले आहे.

गुणवत्ता संवर्धनातील यश हे विद्यालयातील संघटित कार्याचे फलित आहे.तसेच, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही नवनवीन उपक्रम राबवत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सतत प्रयत्न करणार आहे,” – प्राचार्य संतोष भंडारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!