वाघोली ( ता.हवेली) वाचनाने माणूस ज्ञानी होतो, त्याला पुस्तकाच्या रूपाने एक नवीन मित्र मिळतो. वाचन ही एक कला असून वाचन माणसाला माणूस बनविते,त्यांच्यातला माणूस घडवते, विविध ज्ञानशाखांचा त्याला परिचय होतो, त्याच्या जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करविते, त्याचप्रमाणे जीवनात योग्य- अयोग्य काय याची जाणीव करून देते. आपल्या समाजात ‘वाचाल तर वाचाल’ अशी म्हण प्रचलित असून वाचन हे जीवनाचे अविभाज्य अंग असून सातत्याने वाचन केल्याने आदर्श व बहुगुणी व्यक्तिमत्त्व विकास होतो असे प्रतिपादन बीजेएस प्रबंध समिती सदस्य व प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंके यांनी व्यक्त केले.
या पुस्तक वाचन कार्यशाळेमध्ये महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. सहदेव चव्हाण यांनी वाचन कसे करावे वाचन करताना लेखक पुस्तकाचा विषय, प्रस्तावना इत्यादी सर्व बाबींचा अभ्यास केला पाहिजे. पुस्तकात असलेल्या इतर संदर्भ व त्यांचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी व प्राध्यापकांसाठी पुस्तक वाचन झाल्यानंतर त्यावर निबंध लेखन स्पर्धा व त्या पुस्तकाच्या आशयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यशाळेत इतिहास विभाग प्रमुख डॉ. भूषण फडतरे व हिंदी विभाग प्रमुख डॉ सिद्धेश्वर गायकवाड यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने समाजात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले जातात. त्याचाच भाग म्हणून बीजेएस वसतिगृहातील अनेक विद्यार्थ्यांनी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्या समवेत सहभाग घेत कथा कादंबरी, जीवनचरित्र, बालमित्र, प्रेरणादायी पुस्तक विज्ञान कथा अशा अनेक प्रकारच्या पुस्तकांचे सामुहिक वाचन करत वाचनाचा आनंद घेतला.
या कार्यक्रमाप्रसंगी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे व कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ.मनीषा बोरा तर आभार प्रदर्शन डॉ. सिद्धेश्वर गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन शसाईनाथ रापतवार व डॉ. बळवंत लांडगे, कार्यालयीन अधिक्षक एस.डी. पाटील व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.