काळजाचा थरकाप उडवणारा ओंकारचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतात!
बारामती शहर आज एका अत्यंत हृदयद्रावक घटनेने हादरले आहे. मोरगाव, कसबा आणि बारामतीला जोडणाऱ्या गजबजलेल्या महात्मा फुले चौकात झालेल्या एका भीषण अपघातात ओंकार नावाच्या व्यक्तीचा जीव गेला, पण मृत्यू समोर असतानाही त्याने आपल्या मुलींसाठी दाखवलेली तगमग आणि त्याग पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत. पोटापासून खाली काहीच शिल्लक उरलं नसतानाही, तो फक्त एकच गोष्ट उच्चारत होता, “माझ्या मुलींना तेवढं वाचवा…!” हा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.
महात्मा फुले चौकात, जो वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक मानला जातो, सकाळी साडेदहाच्या सुमारास ओंकार आपल्या दोन लहान मुलींसह अवघ्या दोनशे फुटांवर असलेल्या घराकडे निघाला होता. नियतीने जणू त्याचा हा शेवटचा क्षण ठरवला होता. भरधाव वाहनाखाली सापडून त्याच्या शरीराचा खालचा भाग पूर्णपणे निकामी झाला होता. मात्र, आपल्या लाडक्या मुलींच्या काळजीने त्याने धरून ठेवलेला जीव अनेकांना अस्वस्थ करणारा आहे.
अपघाताच्या भीषणतेने अंगावर काटा येतो. चाक अंगावरून गेले होते, पोटाखालून काहीच उरले नव्हते. तरीदेखील, मृत्यूसमोर उभा असताना, ओंकारने अवसान आणले. हाताच्या कोपऱ्यावर डोके उचलून तो फक्त सांगत होता, “माझ्या मुलींना वाचवा!” त्यावेळी त्याची साडेतीन वर्षांची मुलगी त्याच्यासमोर पडलेली होती, तर सहा वर्षांची दुसरी मुलगी चाकाखाली होती. पित्याच्या या अखेरच्या विनवण्या आणि मुलींसाठीची त्याची तगमग पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
ओंकार मूळचा इंदापूर तालुक्यातील सणसरचा. अत्यंत शांत स्वभावाचा, दिसेल त्या प्रत्येकाशी हसतमुखाने बोलणारा. त्याचे आई-वडील शिक्षक असल्याने त्याचे संस्कारही तसेच होते. निवृत्तीनंतर हे कुटुंब बारामतीत राहायला आले, कारण इतरांप्रमाणेच ओंकार आणि त्याच्या पत्नीने बारामतीतील आधुनिक शिक्षणाचा ध्यास घेतला होता.
आपल्या दोन्ही गोंडस मुलींना चांगले शिक्षण देऊन घडवण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र, आजच्या या अपघाताने त्यांचे हे स्वप्न अर्धवटच राहिले. शाळेतूनच निघालेला हा प्रवास घराच्याही अलीकडेच रस्त्यावरच काळाच्या झडपेने संपवला. फार्मासिस्ट म्हणून शिक्षण घेतलेल्या ओंकारने करिअर आणि मुलींच्या उज्वल भविष्यासाठीच आधुनिक शिक्षणात अग्रेसर असलेल्या बारामतीची निवड केली होती. पण दुर्दैवाने, त्याची ही लढाई जिंकण्यापूर्वीच त्याने आज शेवटचा श्वास घेतला. मृत्यू समोर दिसत असतानाही, समोर पडलेल्या लाडक्या सईसाठी त्याचा जीव तीळ तीळ तुटत होता. त्याचा हा हृदयद्रावक व्हिडिओ कोणीतरी काढला आणि तो काळजाचा ठाव घेणारा ठरला आहे.
या घटनेने प्रचंड वेगाने विकसित होत असलेल्या बारामतीमधील वाहतूक कोंडी आणि त्यातून उद्भवणाऱ्या अपघातांचा भीषण चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. ओंकारने आपल्या मुलींना वाचवण्याची आर्ट हाक बारामतीकरांची झोप उडवणारी ठरली असून, रस्त्यांवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.