अविश्वास ठराव २५६ मतांनी मंजूर, जिल्ह्यातील पहिलीच घटना
सातारा तालुक्यातील अपशिंगे मिलिटरी गावात शुक्रवारी (दि.१२) झालेल्या मतदान प्रक्रियेत लोकनियुक्त सरपंचांविरोधात अविश्वास ठराव प्रथमच मंजूर करण्यात आला. या घटनेने केवळ अपशिंगेच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात राजकीय चर्चांना ऊत आला आहे.
गावातील सरपंच तुषार शिवाजी निकम यांच्याविरोधात हा अविश्वास ठराव आणण्यात आला होता. लोकनियुक्त सरपंच निवडून आल्यानंतर दोन अडीच वर्षांनीच असा ठराव मांडता येतो. त्यानुसार गावकऱ्यांकडून गुप्त मतदान घेण्यात आले. सकाळी ११ वाजता सुरू झालेली प्रक्रिया दुपारी ४ पर्यंत चालली.
एकूण ३३९१ पैकी १९३१ मतदारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १९०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ३७ मते अवैध ठरली. उर्वरित १८७० वैध मतांपैकी १०६३ मते अविश्वास ठरावाच्या बाजूने तर ८०७ मते विरोधात पडली. त्यामुळे २५६ मतांच्या फरकाने ठराव मंजूर झाला.
या निवडणुकीचे अध्यासी अधिकारी म्हणून सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निलेश पाटील यांनी जबाबदारी पार पाडली. सहा बूथवर मतदान प्रक्रिया पार पडली. गावात उत्सुकता व तणावाचे वातावरण असल्याने बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ग्रामपंचायत अधिकारी व महसुल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मतदान शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
गावकऱ्यांच्या थेट गुप्त मतदानाद्वारे लोकनियुक्त सरपंचांना पदावरून पायउतार व्हावे लागल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना ठरली आहे. ग्रामपंचायत व्यवस्थेत अशा प्रकारचे मतदान विरळाच पाहायला मिळते. त्यामुळे स्थानिकांसह संपूर्ण तालुक्यात या निकालाची जोरदार चर्चा रंगली आहे.
