महायुतीच्या टिकेला सडेतोड उत्तर
गुनाट (ता. शिरूर)– महाविकास आघाडीचे शिरूर हवेलीचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ गुनाट येथे आयोजित गावभेट दौऱ्यात जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. “शरद पवार महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि जनहितासाठी हिमालयासारखे भक्कमपणे उभे आहेत,” असे सांगत त्यांनी महायुतीच्या नेत्यांच्या खालावत चाललेल्या टिकेचा तीव्र निषेध केला.
सुजाता पवार म्हणाल्या, “शरद पवार यांच्यावर खोटी टीका करणाऱ्या नेत्यांचे विचार आणि माणुसकीची पातळी खालावत चालली आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि प्रगतीसाठी शरद पवार या वयातही संपूर्ण राज्यभर काम करत आहेत. त्यांच्या या अपार प्रयत्नांनी महायुतीच्या नेत्यांना धडकी भरली आहे, म्हणूनच ते खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्ये करीत आहेत.”
सुजाता पवार यांनी ठामपणे विश्वास व्यक्त केला की, “शरद पवार यांच्यावरील जनतेचे प्रेम आणि त्यांच्या कार्याचा आदर मतपेटीतून महायुतीच्या टिकेला योग्य उत्तर देईल.”
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – या दौऱ्यात पंचायती समितीचे माजी सभापती बाजीराव कोळपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सतिष कोळपे, चेअरमन सचिन कर्पे, माजी सरपंच गहीनीनाथ डोंगरे, अनिल कर्पे, भाऊसाहेब कर्पे, संतोष भोस आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी पवारांच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या कार्याची दाद देत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, ज्यात त्यांच्या विश्वासाचा आणि आस्थेचा प्रत्यय आला.