शिक्रापूर येथे माऊली सेवा मंडळाची भक्तीमय परंपरा, यंदा ७० दिंड्यांचे उत्साहात स्वागत!

स्वराज्य टाईम्स न्यूज

 माऊली सेवा मंडळाची १८ वर्षांची सेवा अखंड अन्नदान सेवा 

शिक्रापूर (ता. शिरूर) आळंदीच्या कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२८ व्या संजीवन समाधी सोहळ्याचा उत्सव अनुभवण्यासाठी लाखो भाविक वारकरी पायी वारीसाठी निघाले आहेत. याच पवित्र वारीदरम्यान, शिक्रापूर गावाने आपली १८ वर्षांची अन्नदान सेवा परंपरा जपत यावर्षी तब्बल ७० दिंड्यांचे उत्साहाने स्वागत केले.  

माऊली सेवा मंडळाच्या वतीने वारकऱ्यांसाठी सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि संध्याकाळचे भोजन दिले जाते. तसेच विश्रांतीसाठी सोयी आणि थकलेल्या वारकऱ्यांना आधार देण्याची व्यवस्था केली जाते. या सेवेमुळे वारकऱ्यांना आपल्या घरासारखे वातावरण मिळते, तर गावकऱ्यांना भक्तिभाव आणि माणुसकीची अनुभूती होते.  

वारकरी आणि सेवाभावाचा अनोखा संगम –   कार्तिकी वारी निमित्त वारकरी मोठ्या भक्तिभावाने विठ्ठलाचे अभंग गात,नाचत,बागडत माऊलीच्या जयघोषात पुण्यक्षेत्र आळंदीकडे चालत असतात, तर ग्रामस्थ त्यांच्या थकलेल्या शरीराला आराम व देत प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रयत्न करतात. या माणुसकीच्या अनोख्या संगमामुळे शिक्रापूर हे वारकऱ्यांच्या सेवेसाठी आदर्श ठिकाण ठरले आहे. 

वारकऱ्यांशी नाते – वारकऱ्यांची केली जाणारी सेवा त्यांच्यासाठी  नाष्टा व अन्नदान करताना त्यांच्याशी होणारा संवाद आणि त्यांना मिळणारा विश्रांतीचा आधार, ही फक्त सेवा नसून माणुसकीचे धर्माचे व वारकरी ससेवेचे अनोखे दर्शन आहे. यामुळे वारी आणि शिक्रापूर गाव यांचे एक अनोखे नाते निर्माण झाले आहे.  

ग्रामस्थांच्या निःस्वार्थ सेवेमुळे, शिक्रापूरचा वारकरी दिंड्यामध्ये मोठा आदर आहे. या परंपरेने आजवर हजारो वारकऱ्यांना मानसिक आणि शारीरिक आधार दिला आहे, ज्यामुळे वारीचा हा प्रवास अधिक पवित्र आणि सुखद बनतो. शिक्रापूरची ही भक्तीमय परंपरा समर्पण आणि सेवाभावाचा उत्कृष्ट आदर्श ठरली आहे.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, कृष्णा सासवडे, मोहन विरोळे, कांतीलाल भुजबळ, जयाभाऊ विरोळे, दिलीप भुजबळ, पोपट गायकवाड, भरत म्हेत्रे, शांताराम राऊत, पंढरीनाथ राऊत, चौरसिया व बलदोटा बंधू, पानमंद बंधू आणि हारून इनामदार यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

“मागील १८ वर्षांपासून ही सेवा अखंड सुरु आहे. यावर्षीही शेकडो वारकऱ्यांना प्रेमाने आणि भक्तिभावाने भोजन व विश्रांती दिली गेली. या परंपरेत गावकऱ्यांचा सहभाग हा खरोखरच प्रेरणादायी आहे.” – आदर्श सरपंच रमेश गडदे, शिक्रापूर ग्राम पंचायत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!