भावकी आज झोपणारच नाही
न्हावरे (ता.शिरूर) आजच्या या प्रचार सभेला जमलेली गर्दी बघता माऊली कटके यांचा विजय आजच निश्चित झालेला आहे. याच विजयाच्या जोरावर सद्या बंद असलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुढल्या वर्षी सुरु करणार आहे.सद्या उसाचा गळीत हंगाम सुरु झाला आहे. आपल्या उसाचे काय होणार? म्हणून शेतकरी वर्ग घाबरलेला आहे. मात्र शेतकऱ्यांनो तुम्ही घाबरू नका. तुमच्या शेतातील ऊस नेण्यासाठी दौंड शुगर, अंबालिका, पराग, श्रीनाथ म्हस्कोबा, सोमेश्वर व माळेगाव कारखान्याला सांगू. तुमच्या शेतात उसाचे एक टिपरु सुद्धा दिसू देणार नाही. अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. शिरूर हवेली विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांच्या प्रचारानिमित्त न्हावरे (ता.शिरूर) येथील सभेत ते बोलते होते.
शिरूर हवेली विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांच्या प्रचारानिमित्त न्हावरे (ता.शिरूर) येथे रविवारी (ता.१७) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महायुतीचे विविध पदाधिकारी , कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.
यापुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, आमदारांच्या मुलाला मारहाण करून छळ केला. त्याच्यात कटकेंचे कार्यकर्ते तेथे होते. निवडणुकीच्या निमित्ताने भावनिक मुद्दा करून लोकांची मते मिळविण्याकरता काही लोक इतक्या खालच्या थराला जात असतील. हे एक आपल्या सगळ्यांचे दुर्दैव आहे. खुल्या मानाने निवडणुका लढणार. असला रडीचा डाव कशाला करताय? त्यांच्या पक्षातील कार्यकर्ता कोळपे यांनी बँकेच्या कर्जापोटी हे कृत्य केले आहे. कोळपे यांनी हा गुन्हा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी केलेला असल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. या गुन्ह्यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र भावाकीने माऊलीवर रचलेला हा डाव आहे.
दरम्यान, विरोधकांच्या खोट्या अफवांना बळी पडू नका. मला जर कारखाना बंद पाडायचा असता तर घोडगंगा कशाला व्येंकटेश बंद पाडला असता. मात्र केंद्रात अजून भाजप व महायुतीचे अजून साडेचार वर्ष सरकार आहे. त्यामुळे कारखाना सुरु करण्यासाठी अमित शहांची मदत घेऊ. यामधून मार्ग काढून शेतकऱ्यांच्या हितासाठी शिरूर तालुक्याचे वैभव पुन्हा पुढल्या वर्षीपासून सुरु करू? त्यासाठी तुम्ही महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांना प्रचंड प्रचंड मतांनी विजयी करा. असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले आहे.
भावकी आज झोपणार नाही : अजित पवार यांनी शिरूर हवेली विधानसभा मतदार संघ हा पुणे जिल्ह्यातील अतंत्य महत्वाचा मतदार संघ आहे. या मतदार संघाच्या विकासासाठी महायुती सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत. तरीही या मतदार संघातील अनेक नागरिकांच्या समस्या आहेत. त्या समस्या सोडविण्याची आमची सर्वांची जबाबदारी आहे. नागरिकांची कोणतीही फसवणूक होऊ देणार नाही. आम्ही काम करणारी माणसं आहोत. ही सभा पाहिल्यानंतर माझी भावकी आज झोपणारच नाही. पण, उद्याचे दोन दिवस महत्वाचे आहेत. बाबा काहीही करेल. त्यामुळे जागे राहा, रात्र वैऱ्याची आहे. असा घणाघात अजित पवार यांनी अशोक पवार यांच्यावर केला आहे.