पिंपरी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईत मंडलाधिकारी सुरेंद्र जाधव (वय ५६) यांना ४ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. तक्रारदाराने वाल्हेकरवाडी येथे बंगला बांधल्यानंतर सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी मंडलाधिकारी जाधव यांनी ५ लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे केली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली असता, जाधव यांनी तडजोडीनंतर ४.५० लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज (४ मार्च) सापळा रचून कारवाई करण्यात आली. तक्रारदाराने ४ लाख रुपये देताच जाधव यांनी ती रक्कम त्यांच्या सरकारी कार्यालयाच्या पार्किंगमध्ये उभी असलेल्या हयुंदाई क्रेटा एम एच १४ जे क्यू ८२८२कारमध्ये ठेवली. यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले.
जाधव यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उप-अधीक्षक भारती मोरे करत आहे.