वढु खुर्द येथे ‘विजयी गुलाल’ उधळण्याचा बैलगाडा प्रेमींचा निर्धार
वढू खुर्द (ता. हवेली): लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील राजकीय घाटात आता पै. किरण साकोरे यांचीच बारी बसणार आणि आम्हीच विजयाचा गुलाल उधळणार, असा ठाम निर्धार बैलगाडा मालक, शेतकरी आणि युवकांनी व्यक्त केला आहे. वढु खुर्द येथे संपन्न झालेल्या ‘बैलगाडा मालक संवाद मेळाव्यात’ काळया आईच्या लेकरांसाठी आणि लाल मातीतल्या संस्कृतीसाठी अहोरात्र धावून येणाऱ्या पै. किरण साकोरे यांना ऐतिहासिक आणि भरघोस पाठिंबा जाहीर करण्यात आला. आगामी निवडणुकीत शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर राहणाऱ्या आणि विकासाचा झंझावात निर्माण करणाऱ्या या ‘पैलवानाला’ विजयी करण्याचा वज्रनिर्धार या मेळाव्यात करण्यात आला.

याप्रसंगी भाजपाचे क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष पै. संदिप भोंडवे, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तथा संचालक रविंद्र कंद, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे संचालक जयसिंग एरंडे, बाबासाहेब दरेकर, यासह असंख्य मान्यवर, बैलगाडा शौकीन, चालक-मालक व पदाधिकारी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पै. संदीप भोंडवे अन् बैलगाडा मालकांचा निर्धार – या मेळाव्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे बैलगाडा मालक आणि कुस्तीगीर परिषदेचे अभूतपूर्व संघटन. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे यांनी विजयाचे रणशिंग फुंकताना सांगितले की, “किरण साकोरे हा माझा पट्टशिष्य असून लाल मातीतला अस्सल पैलवान आहे. ज्याप्रमाणे आम्ही कुस्ती क्षेत्रात ताकद लावतो, तशीच ताकद आता त्याला निवडून आणण्यासाठी लावू. सर्वसामान्यांना देवदर्शन यात्रा घडवणारा आणि अडीअडचणीला धावणारा आपला माणूस आता जिल्हा परिषदेत दिसेल.”

यावेळी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे संचालक जयसिंग येरंडे यांनी साकोरे यांच्यावर असलेल्या प्रेमाची पावती देताना म्हटले की, “पुणे जिल्हा परिषद निवडणुकीचा जो पहिला विजयी निकाल आणि गुलाल लागेल, तो पै. किरण साकोरे यांचाच असेल.”
सेवेचा वसा आणि विकासाचा झंझावात – स्वभावाने शांत, संयमी आणि हसतमुख असणारे फुलगावचे सुपुत्र पै. किरण साकोरे यांनी सेवा, भक्ती आणि समर्पण यांतून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रदिप विद्याधर कंद यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेली विकासकामे आणि साकोरे यांचा दिवसेंदिवस वाढणारा दांडगा जनसंपर्क यामुळे या गटात विजयाचे पोषक वातावरण निर्माण झाले आहे. प्रदिप विद्याधर कंद यांच्या या शिलेदाराला सर्वसामान्य जनतेने आपला ‘हक्काचा उमेदवार’ म्हणून मनापासून स्वीकारले आहे.
या संपूर्ण राजकीय प्रवासाचे मार्गदर्शक आणि विकासाचे केंद्रस्थान म्हणजे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप विद्याधर कंद हेअसून त्यांनी नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याचे काम केले असून, त्यांनी किरण साकोरे यांच्यावर टाकलेला विश्वास हा या गटाच्या प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. “प्रदिप विद्याधर कंद यांचा शब्द आणि साकोरे यांची विकासकामांची जिद्द” हे समीकरण सध्या जनमानसात लोकप्रिय झाले असून, प्रदिप विद्याधर कंद यांची ही अचूक निवड आता विजयाचा नवा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाली आहे.
