पोलीस पाटील संघाच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेवू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

Swarajyatimesnews

राज्यातील पोलीस पाटीलांच्या मानधन आणि सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेबाबतच्या महत्त्वपूर्ण मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यांनी पोलीस पाटीलांच्या सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्याच्या मागणीवर राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही स्पष्ट केले.

हनुमान नगर येथील डॉ. ईश्वर देशमुख क्रीडा महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ‘महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाच्या ८ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात’ प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, परिणय फुके, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ आणि पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलीस पाटीलांच्या गेल्या चार महिन्यांच्या थकीत मानधनाच्या प्रश्नावर त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. “येत्या २ सप्टेंबरला या संदर्भात शासन निर्णय निर्गमित केला जाईल,” असे  सांगितले. तसेच, पोलीस पाटीलांना सेवानिवृत्तीनंतर मानधन देण्याबाबत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व प्रकारचे उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीस यांनी पोलीस पाटीलांना गावातील कायदा सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेसाठी त्यांच्या अधिकारांचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले. तसेच, पोलीस पाटलांचा सन्मान राखला जाईल आणि त्यांना प्रशासनातून अपमान सहन करावा लागणार नाही, यासाठी एक सुस्पष्ट कार्यप्रणाली तयार करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी, २००० वर्षांचा गौरवशाली इतिहास असणाऱ्या पोलीस पाटील या संरचनेच्या अधिवेशनात उपस्थित राहणे हा गौरवाचा क्षण आहे. पोलीस पाटील हे गावाचे गृहमंत्री असतात कायदा सुव्यवस्थेसह या संरचनेत आता महिला सुरक्षा हा महत्वाचे कर्तव्य आहे. त्यासाठी पोलीस पाटीलांनी अधिकाराबरोबरच कर्तव्याच्या जाणीवेतून कार्य करण्याचे आवाहन केले. राज्य शासनाने या पदाला मान व मानधन मिळावा म्हणून वाढीव १५ हजार रुपये मानधन दिले. याबद्दल कृतज्ञ भाव म्हणून आजचा हा अभिनंदन सोहळाही आयोजित केला याचे अप्रुप वाटत असल्याच्या भावना  फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

पोलीस पाटीलांच्या गेल्या ४ महिन्यांचे थकीत मानधन लक्षात घेता या कार्यक्रमातच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गृह विभागाच्या अपर सचिवांना दूरध्वनीवरुन सूचना केल्या आणि येत्या २ सप्टेंबरला शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल असेही सांगितले.

या अधिवेशनात आमदार बावनकुळे, परिणय फुके आणि विशेष पोलीस महानिरीक्षक पाटील भुजबळ यांनीही पोलीस पाटीलांना मार्गदर्शन केले. अधिवेशनाच्या प्रारंभात संघाचे कार्याध्यक्ष परशुराम पाटील यांनी स्वागतपर भाषण केले, तर अध्यक्ष बाळासाहेब शिंदे-पाटील यांनी प्रास्ताविक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!