शिक्रापूरचा कचरा सणसवाडीच्या माथी; बेकायदा कचरा डेपो आणि धुराच्या लोटामुळे ग्रामस्थ हैराण
सणसवाडी (ता. शिरूर): पुणे-नगर महामार्गावरील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असलेल्या सणसवाडी गावाला आता ‘कचऱ्याचे माहेरघर’ अशी नवी आणि विदारक ओळख मिळू लागली आहे. शिक्रापूर ग्रामपंचायतीचा कचरा सणसवाडीच्या हद्दीत अवैधरित्या आणून टाकला जात असून, दुसरीकडे सणसवाडीत डोंगर वस्ती भागात जाळला जात आहे. या दुहेरी संकटामुळे सणसवाडीतील कामगार आणि स्थानिक रहिवाशांचे आरोग्य टांगणीला लागले असून, प्रशासनाविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे.
शिक्रापूरचा कचरा, सणसवाडीत दुर्गंधी! – शिक्रापूर ग्रामपंचायतीने आपला कचरा स्वतःच्या हद्दीत विल्हेवाट लावण्याऐवजी तो सणसवाडीतील एका गोदामात साठवण्याचा व तेथून एकत्रित करून पाठवण्याचा सपाटा लावला आहे. हजारो लोकसंख्येच्या या गावाचा कचरा कोणत्याही प्रक्रियेशिवाय सणसवाडीत येत असून या दुर्गंधामुळे औद्योगिक क्षेत्रात प्रचंड उग्र वास पसरला असून, अनेक कंपन्यांनी तक्रारी करूनही दोन्ही ग्रामपंचायतींनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.
“शिक्रापूरने आपला कचरा आपल्या हद्दीत सांभाळावा, सणसवाडीच्या आरोग्याशी खेळू नये,” असा सज्जड दम सरपंच शशिकला सातपुते यांनी दिला आहे.
रात्रीच्या वेळी धुराचे लोट; डोंगर वस्ती त्रस्त – दुसरीकडे, सणसवाडी ग्रामपंचायतीचा स्वतःचा कचरा डोंगर वस्ती परिसरात टाकून तो रात्रीच्या वेळी पेटवून दिला जातो. या कचऱ्याच्या धुरामुळे संपूर्ण गावात धूर पसरत असून श्वसनाचे विकार बळावण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर प्रश्नावर उद्योजक राजेश भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, “शासकीय आदेश असतानाही कचरा जाळणे थांबले नाही, तर ग्रामस्थांच्या जिवाशी खेळणाऱ्या प्रशासनावर तातडीने कारवाई व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश धाब्यावर? – याप्रकरणी अक्षय वाळुंज यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवरून तक्रार दाखल केली होती. त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) दि. ०२/०६/२०२५ रोजी पत्र पाठवून ग्रामसेवक, तलाठी आणि तहसीलदारांना कारवाईचे अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, आदेश येऊनही स्थानिक पातळीवर हालचाल होत नसल्याने “प्रशासन आणि ठेकेदार यांचे साटेलोटे आहे का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
