लोणीकंद–पेरणे गटातील भाविकांनी अनुभवली काशी विश्वनाथ दर्शन यात्रा आणि गंगेची दिव्य आरती, पै. किरण साकोरे यांचा सेवाभाव
वाराणसी/पुणे – काशी ही भक्ती, अध्यात्म आणि शांततेने नटलेली नगरी. रविवारी सायंकाळी दशाश्वमेध घाटावर गंगेच्या आरतीचा दिव्य सोहळा सुरू होताच संपूर्ण घाट दीपज्योतींनी उजळून निघाला. लालसर आकाशाच्या पार्श्वभूमीवर लहरणाऱ्या ज्योती, शंखनाद, घंटांचा निनाद आणि कापूराचा सुवास यामुळे येथे उपस्थित भाविकांच्या मनात अपूर्व भक्तिभाव जागृत झाला. अनेकांच्या डोळ्यांत श्रद्धेने अश्रू दाटले होते.हर हर महादेव… जय महाकाल! आमच्या जिवाभावाचा किरण साकोरे हेच आमच्यासाठी श्रावणबाळ, अशा शब्दांत लोणीकंद–पेरणे गटातील भाविकांनी काशी विश्वनाथ दर्शन यात्रेतील अनुभव व्यक्त केला.

या पवित्र सोहळ्यात पै. किरण संपत साकोरे यांच्या हस्ते गंगा आरतीचे औचित्य पार पडले. आरतीदरम्यान भाविकांच्या मनातून एकच प्रार्थना उमटत होती—“माता गंगे, काशी विश्वनाथ, आमच्या किरण साकोरेंची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत.” भाविकांनी किरण साकोरे यांच्याबद्दल व्यक्त केलेला प्रेमळ भाव आणि त्यांच्याशी असलेले आपुलकीचे नाते संपूर्ण वातावरणात जाणवत होते. किरण साकोरे हे समाजकारणात लोकाभिमुख काम करणारे, युवकांना दिशा देणारे आणि सर्व घटकांसाठी सदैव तत्पर असलेले सेवाभावी नेते आहेत. म्हणूनच भाविकांनी त्यांना ‘आमचं श्रावणबाळ’ अशी स्नेहपूर्ण उपाधी दिली आहे.

आरतीनंतर गंगेच्या प्रवाहात दीप सोडण्याचा भावपूर्ण क्षण भाविकांनी अनुभवला. प्रत्येक दीप हा एक आशा, एक मनोकामना आणि एक प्रार्थना घेऊन वाहत होता. यात्रेकरूंनी हे दीप किरण साकोरे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी अर्पण केले. या संपूर्ण यात्रेचे आयोजन अत्यंत सुंदरपणे आणि नियोजनबद्धपणे करण्यात आले होते. प्रदीप दादा कंद युवा मंच, पै. किरण साकोरे मित्र परिवार आणि स्वयंसेवकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे यात्रेकरूंना संपूर्ण प्रवासात उत्कृष्ट सुविधा मिळाल्या. रेल्वे प्रवास, स्वच्छ भोजन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुरक्षित व आरामदायी निवास, आरोग्यसेवा आणि वयोवृद्धांसाठी विशेष व्यवस्था—या सर्व गोष्टींमुळे यात्रेकरू समाधानी होते.

गंगा आरतीनंतर भाविकांनी शांतचित्ताने काशी विश्वनाथांचे निवांत दर्शन घेतले. मंदिर परिसरातील शांतता, दिव्य वातावरण आणि भक्तीभाव यांनी सर्वांच्या मनात अध्यात्मिक ऊर्जा संचारली. दर्शनानंतर भाविकांनी “जशी पवित्र गंगा अखंड वाहते, तशीच किरण साकोरे यांच्या कार्ययात्रेलाही अखंड यश मिळो” अशी मनापासून प्रार्थना केली.
काशीतील हा अनुभव केवळ धार्मिक , सामाजिक एकात्मतेचा, सेवाभावाचा आणि प्रेरणेचा संदेश देणारा ठरला. यात्रेतील प्रत्येक क्षणातून भक्तिभाव, समर्पण आणि आपुलकीचा भाव प्रकट होत होता. गंगेच्या आरतीपासून मंदिर दर्शनापर्यंत प्रत्येक क्षणाने भाविकांना अध्यात्मिक शांततेचा अनुभव दिला.

हा पवित्र टप्पा पार करताच यात्रेकरू आता पुढील अध्यात्मिक प्रवासासाठी अयोध्याकडे—प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी—प्रस्थान करत आहेत. काशीतील या दिव्य अनुभवाने त्यांच्या मनात श्रद्धा, समाधान आणि नवचैतन्याचा प्रकाश उजळला आहे.
