डॉ. रवींद्रसिंह परदेशी यांचे एनसीसी कॅडेट्सना विशेष मार्गदर्शन
वाघोली, २५ जुलै २०२५: भारतीय जैन संघटनेच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात २६वा कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. १९९९ च्या कारगिल युद्धात भारतीय सैन्याने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचे स्मरण म्हणून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. याप्रसंगी फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य आणि भारतीय जैन संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवींद्रसिंह परदेशी यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) कॅडेट्सना विशेष मार्गदर्शन केले.
डॉ. परदेशी यांनी १९८३ ते १९८९ दरम्यान हिमालयातील लडाख, द्रास आणि कारगिल परिसरातील खडकांवर केलेल्या संशोधनाचा संदर्भ देत कारगिल युद्धातील भौगोलिक रचना आणि भारतीय सैन्यापुढील आव्हानांवर प्रकाश टाकला. त्यांनी १७,००० ते १८,००० फूट उंची, उणे ५० अंश सेल्सिअस तापमान, ऑक्सिजनची कमतरता आणि बर्फाच्छादित प्रदेशात भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याचा कसा सामना केला, याचे सविस्तर वर्णन केले. टायगर हिल, टोलोलिंग, पॉइंट ५१४० आणि पॉइंट ४८७५ यांसारख्या ठिकाणी भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या पराक्रम आणि बलिदानाच्या प्रेरणादायी कथा त्यांनी कॅडेट्ससमोर मांडल्या. डॉ. परदेशी म्हणाले, “शूर सैनिकांचे बलिदान प्रत्येक भारतीयाच्या हृदयात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करते आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील.”
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, “देशाच्या शूरवीरांनी निर्माण केलेला हा वारसा ‘आधी कर्तव्य’ या भावनेने आणि राष्ट्रसेवेसाठी अतूट निष्ठेने प्रेरित आहे. त्यांचे बलिदान केवळ भावी पिढ्यांसाठीच नव्हे, तर कर्तव्य, सन्मान आणि शौर्याच्या भावनेने संरक्षण दलात सेवा करण्याचा निर्णय घेणाऱ्या तरुणांसाठीही प्रेरणादायी आहे.” त्यांनी एनसीसी कॅडेट्सना देशसेवेचा संदेश दिला.
या कार्यक्रमाला एनसीसीचे ९५ कॅडेट्स उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आणि प्रास्ताविक राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख सब लेफ्टनंट डॉ. शिवाजी सोनवणे यांनी केले. प्रा. सिद्धेश्वर सांगोले, डॉ. सचिन कांबळे, कुणाल वारुळे, गिरीश शहा आणि रामदास बटुळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. सूत्रसंचालन कॅडेट अमृता सावंत यांनी केले, तर आभारप्रदर्शन लेडिंग कॅडेट रीती गोंड यांनी केले.
कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्याच्या शौर्याचा आणि बलिदानाचा सन्मान करणारा दिवस असून, या कार्यक्रमाने कॅडेट्समध्ये देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेची भावना बळकट झाली.