पुणे-अहमदनगर मार्गावर वाहतूक कोंडी
पेरणे (ता. हवेली): कोरेगाव भिमा आणि पेरणे गावांच्या हद्दीतील भीमा नदीपात्रात आज एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह (वय अंदाजे ४०-४५ वर्षे) वाहून आलेला आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मृतदेह पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केल्याने पुणे – अहमदनगर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
नदीच्या पाण्यात मृतदेह तरंगताना दिसताच नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी माहिती मिळताच तात्काळ पोलीस यंत्रणा घटनास्थळी पाठवली. पोलिसांनी तातडीने मृतदेह नदीतून बाहेर काढून पुढील तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवला.
घटनास्थळी मृतदेहाची पाहणी करण्यासोबतच, रस्त्यावर झालेली मोठ्या प्रमाणातील वाहतूक कोंडी कमी करण्याचे दुहेरी आव्हान पोलीस यंत्रणेने उत्कृष्टपणे हाताळले. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी अथक प्रयत्न केले.
सध्या या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.