वर्धा: “पप्पा, मला अॅडमिशन घेऊन द्या ना,” अशी विनंती करूनही आर्थिक अडचणीमुळे बारावीला प्रवेश न मिळाल्याने एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लोणसावळी गावात घडली आहे. सोनिया (वय १७) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
लोणसावळी येथे वासुदेव उईके हे पत्नी, मुलगा आणि मुलगी सोनियासोबत राहतात. वासुदेव उईके हे शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगाही बाहेर कामावर जातो. सोनिया वर्ध्याच्या न्यू इंग्लिश महाविद्यालयात कॉमर्स विभागात शिकत होती आणि वर्धेतील आदिवासी शासकीय वसतिगृहात राहत होती.
अकरावीचा अभ्यासक्रम एप्रिल महिन्यात पूर्ण झाल्याने सोनिया घरी आली होती. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू न झाल्याने ती एप्रिलपासून घरीच होती. यावर्षी ती बारावीत गेली असल्याने आणि शाळा सुरू झाल्याने वडिलांना वारंवार प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह करत होती. मात्र, वासुदेव उईके यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ते सोनियाला “तू काही दिवस होस्टेलमध्ये राहा, पैशांची व्यवस्था करून प्रवेश घेऊन देतो,” असे सांगत होते.
घरी कोणी नसताना सोनियाने आयुष्य संपवले – आई, वडील आणि भाऊ कामावर गेले असताना सोनिया घरी एकटीच होती. पैशांअभावी आणि बारावीला प्रवेश न मिळाल्याने आलेल्या निराशेपोटी तिने घरातील बाथरूमच्या अँगलला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.
वडिल कामावरून घरी परतल्यावर त्यांना घराचे समोरचे दार उघडे दिसले. घरात कोणी नसल्याचे पाहून त्यांनी पाहणी केली. तेवढ्यात मुलगाही कामावरून आला. घराचे मधले दार लावलेले पाहून मुलाने मागील बाजूने जाऊन पाहिले असता बाथरूममध्ये सोनिया गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पुलगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.