पुणे जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाच्या तीन अधिकाऱ्यांना लाच प्रकरणी रंगेहाथ अटक

Swarajyatimeenews

एका बॅगेत आढळले ८,५८,४००/- रुपये त्याबाबत तपास सुरू

पुणे  जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांसह उप अभियंता व कनिष्ठ अभियंता हे तिघेजण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात रंगेहाथ सापडले  असून त्यांना लाच घेतल्याप्रकरणी पकडण्यात आले आहे.ACB ने ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या मध्ये बाबुराव कृष्णा पवार, वय ५७ वर्ष, पद कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग (दक्षिण) जिल्हा परिषद, पुणे. (वर्ग-१) तसेच दत्तात्रेय भगवानराव पठारे, वय ५५ वर्ष, पद उपअभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, पुणे (उपविभाग दौंड शिरुर) (वर्ग-१), अंजली प्रमोद बगाडे, कनिष्ठ अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद (उपविभाग दौंड)यांचा समावेश आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शासकिय ठेकेदार असून,ते शासकीय टेंडर घेत असतात. कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग (दक्षिण) जिल्हा परिषद, पुणे यांनी दौंड तालुक्यातील खुटबाव रोड ते गलांडवाडी पांदन शिव रस्ता व गलांडवाडी मंदिर ते ज्ञानदेव कदम घर रस्ता या कामाचे टेंडर सप्टेंबर २०२४ मध्ये प्रसिद्ध केले होते. त्यांना या दोन कामाची वर्कऑर्डर मिळाली होती. या कामाच्या रक्कमेमध्ये जीएसटी व इतर कर अशी दोन्ही कामाची बिल रक्कम ४० लाख रुपये होत आहे.हे काम केल्यानंतर ३ मार्चलां यातील लोकसेवक अंजली बगाडे यांनी केलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन पुणे जिल्हा परिषदे कडील एस क्यू एम कमिटी केलेल्या कामाची पाहणी करुन अहवाल देईल. त्यासाठी त्या कमिटीकरीता प्रत्येक कामापोटी ७,००० रुपये असे १४,००० रुपयाची लाच मागणी केली. तसेच कामाच्या बिलाची फाईल तयार करुन मंजूरीसाठी

ऑनलाईन सादर करण्यासाठी रक्कमेच्या २ टक्के प्रमाणे ८०,००० रुपयाच्या लाचेची मागणी केली.त्यानंतर लोकसेवक दत्तात्रेय पठारे यांना भेटले असता, त्यांनी तक्रारदाराकडे दोन कामाच्या बिलाची फाईल तपासुन ती फाईल वरिष्ठ अधिकारी यांचेकडे पाठवण्यासाठी कामाच्या बिलाच्या रक्कमेच्या २ टक्के प्रमाणे म्हणजे ८०,००० रुपयाच्या लाचेची मागणी केली.त्यानंतर ते बाबुराव पवार यांना भेटले असता, त्यांनीसुद्धा दोन कामाच्या बिलाची फाईल मंजूर करण्याकरीता व बिल देण्याकरीता कामाच्या बिलाच्या रक्कमेच्या २ टक्के प्रमाणे म्हणजे ८०,००० रुपये लाच मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी १० मार्चला लाचलूचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे दिली.

या तक्रारीच्या अनुषंगाने ११ मार्चला त्या तिघांची पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता, लोकसेवक अंजली बगाडे यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन तपासणी करुन अहवाल देणा-या एस क्यूं एम टीमसाठी तक्रारदाराकडे प्रत्येक कामाचे ७,००० प्रमाणे दोन कामाचे १४,००० रुपयाच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.तसेच दत्तात्रेय पठारे यांनी दोन कामाच्या बिलाची फाईल तपासणी करुन वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठवण्यासाठी तडजोडीअंती ६४,००० रुपयाच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.कार्यकारी अभियंता बाबुराव पवार यांनी दोन कामाच्या बिलाची फाईल मंजुर करुन बिल काढण्यासाठी तडजोडीअंती ६४,००० रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार १३ मार्च रोजी केलेल्या सापळा कारवाई दरम्यान बाबुराव पवार यांनी ६४,००० रुपये पंचासमक्ष स्वीकारले.तसेच दत्तात्रेय पठारे यांनी ६४,००० रुपये व अंजली बगावे यांनी मागणी केलेले १४,००० रुपये असे ७८,००० रुपये पंचासमक्ष स्विकारले असता त्याना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. अंजली बगाडे यांनी १४,००० रुपये लाच मागणी करून, ती रक्कम लोकसेवक क्र. २ यांचेकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.या तिघांविरुद्ध बंडगार्डन पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

एका बॅगेत आढळले 

कार्यकारी अभियंता बाबुराव पवार यांचे शासकीय दालनामध्ये एका बॅगेत ८,५८,४००/- रुपये अशी रोख रक्कम मिळून आली असून, ती रक्कम तपासकामी ताब्यात घेण्यात आली असून, त्याबाबत चौकशी सुरु आहे.सदरील कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, पुणे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!