पुणे – उच्च शिक्षण, प्रतिष्ठित नोकरी, आणि गर्भश्रीमंत कुटुंब… अशा स्वप्नवत सासरची आशा घेऊन लग्नबंधनात अडकलेल्या एका इंटेरियर डिझायनर महिलेच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळाले. पती ‘मर्चन्ट नेव्ही’तील उच्च पदस्थ अधिकारी असलेला पती नपुंसक असल्याने सुखी संसाराची स्वप्ने भस्म झाली . सहा महिने बोटीवर आणि सहा महिने घरी असलेल्या पतीच्या वागण्यात काहीतरी वेगळं असल्याचा तिला संशय आला. सत्य उलगडलं तेव्हा तिने धक्कादायक सत्याला सामोरं जावं लागलं. पती नपुंसक असल्याचे कळल्यावर तिचे जग कोसळले. अखेर तिने लोकलज्जेला झुगारून पती आणि सासरच्यांविरोधात कायदेशीर लढाईचा निर्णय घेतला.काही काळ लोकलज्जेस्तव शांत बसलेल्या या महिलेने पती आणि त्याच्या आईवडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.
हा सर्व प्रकार कोथरुडमधील एका आलीशान सोसायटीमध्ये २९ डिसेंबर २०१५ ते १८ डिसेंबर २०१९ या कालावधीत घडला. याप्रकरणी ३६ वर्षीय पिडीत महिलेने फिर्याद दाखल केली असून तिच्या ३७ वर्षीय पती, ६४ वर्षीय सासू, ६६ वर्षीय सासरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत विवाहिता मुळशी तालुक्यातील एका गावामधील शेतकरी कुटुंबातील आहे. तर, आरोपी पतीचे कुटुंबीय बाणेर भागात एका आलीशान सोसायटीमध्ये राहण्यास आहेत. सासू सासरे देखील उच्च शिक्षित असून गर्भ श्रीमंत आहेत.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादीचा पती ‘मर्चन्ट नेव्ही’मध्ये कॅप्टन आहे. पिडीत विविहितेचे आरोपीसोबत २९ डिसेंबर २०१५ रोजी लग्न झाले होते. हे लग्न दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने झालेले होते. लग्नानंतर काही दिवस असेच गेले. या काळात संबंधित महिलेला पतीच्या वागण्याविषयी शंका आलेली नव्हती. तसेच, त्याचे विचित्र वागणे देखील लक्षात आलेले नव्हते. पती तिच्या जवळ जाण्यास किंवा शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास टाळाटाळ करीत होता. सहा महिन्यांपर्यंत असा प्रकार सुरू होता. दरम्यान, पती ‘मर्चन्ट नेव्ही’मध्ये नोकरीस असल्याने तो सहा महीने घरी आणि सहा महीने बोटीवर असायचा. त्यामुळे तिने स्वत:चीच समजूत काढली. काही दिवसांनी त्याच्या वागण्याचे कारण शोधण्याचा तिने प्रयत्न सुरू केला. कदाचित पतीच्या इच्छेविरूद्ध लग्न लावण्यात आलेले असावे किंवा पतीला आपण आवडत नसू अशी तिची समजूत झाली.
परंतु, दोन वर्ष उलटल्यानंतर देखील त्यांच्यामध्ये काहीच न घडल्याने तिची शंका बळावली. तिने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आपला पती नपुंसक असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने माहेराला जाऊन आईवडिलांशी याविषयी चर्चा करण्याचा विचार केला. मात्र, त्याच वेळी तिच्या मोठ्या भावाचे घटस्फोटाचे प्रकरण सुरू झालेले होते. भावापाठोपाठ मुलीचा देखील संसार मोडतोय या विचाराने आईवडिलांना त्रास होईल असा विचार करून तिने याविषयी माहेरी वाच्यता करण्याचे टाळले. दरम्यान, तिने एक दिवस सासू सासरे यांच्यासोबत याविषयी चर्चा केली. तसेच, त्यांना पतीच्या वागण्याविषयी कल्पना दिली. त्यावेळी आणखी धक्कादायक माहिती तिला समजली. तिच्या सासू सासऱ्यांना आपला मुलगा ‘नपुंसक’ असल्याची माहिती होती.
मुलगा नपुंसक असल्याचे माहिती असून देखील त्यांनी त्याचे लग्न लावले होते. आपली फसवणूक झालेली असून आपल्या आयुष्याचे मोठे नुकसान झाल्याची जाणीव या विवाहितेला झाली. त्यानंतर, तिने सासरचे घर सोडले. पोलिसांकडे याविषयी तक्रार दाखल केली. पोलिसांनी याविषयी तपास करून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैशाली सुळ करीत आहेत.