शिक्रापूर येथे वाचनालयाच्या वतीने बालदिनानिमित्त ७५ बालकांचा सन्मान

स्वराज्य टाईम्स न्यूज

ग्रामपंचायत शिक्रापूर वाचनालयाचा आदर्श उपक्रम!!

शिक्रापूर (ता.शिरूर)  माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त शिक्रापूर ग्रामपंचायत संचलित शासनमान्य भैरवनाथ मोफत वाचनालयाने बालदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. या उपक्रमात तब्बल ७५ बालकांचा सन्मान करण्यात आला. बालकांना पेन्सिल, खोडरबर, शॉपनर, गुलाब पुष्प आणि खाऊ वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आला.  

       बालदिनाचे औचित्य साधून वाचनालयात बाल वाचन मेळावा आयोजित करण्यात आला.  या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिरूर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष संतोष गावडे गुरुजी आणि संजय थिटे  उपस्थित होते.  कार्यक्रमादरम्यान माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.  

विद्यार्थिनी उत्कर्षा दानवे, जिज्ञासा मगदूम, मनस्वी नाईक, आणि जीविका वानखेडे यांनी माजी पंतप्रधान पंडित नेहरूंच्या जीवनावर प्रेरणादायी भाषण केले.   संतोष गावडे गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देत वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी पुढील काळात वाचनालयाचे सभासदत्व मोफत देण्याची घोषणाही केली.  

या कार्यक्रमामुळे वाचनाचे महत्त्व आणि पंडित नेहरूंच्या विचारांची ओळख विद्यार्थ्यांना झाली. बालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा या उपक्रमाचा खरा यशस्वी क्षण ठरला.  शिक्रापूर ग्रामपंचायतीने घेतलेला हा उपक्रम वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे.ग्रामपंचायत वाचनालयाचे ग्रंथपाल संतोष दशरथ काळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन केले.  

यावेळी सरपंच रमेश गडदे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे, आदर्श ग्रंथपाल संतोष काळे, पत्रकार राजाराम गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सुरज चव्हाण आणि प्रशांत वाबळे आदी मान्यवरांनी बालकांना शुभेच्छा दिल्या.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!