सणसवाडीत सुरू होणार लावणी महोत्सव – उपसरपंच राजेंद्र दरेकर 

Swarajyatimesnews

सणसवाडीकरांची घोषणा 

दिनांक १६ मार्च सणसवाडी (ता.शिरूर)पारंपारीक लावणी जपण्याचे काम तब्बल ३५ वर्षांपासून सणसवाडीतील अंबीका कलाकेंद्रापासून तर पुजा व लक्ष्मी कलाकेंद्र करीत आहेत. लावणीचे गाव म्हणून सणसवाडी गावची ओळख निर्माण करण्यातही लावणी कलाकारांचे मोठे योगदान आहे. पर्यायाने अकलुज लावणी महोत्सवाचे धर्तीवर लवकरच गावात सणसवाडी चलावणी महोत्सव सुरू करण्याची घोषणा येथील उपसरपंच राजुआण्णा दरेकर यांनी केली. बाजीराव-मस्तानी ट्रस्टचे अध्यक्ष राज गायकवाड, अंबीका कलाकेंद्राच्या संचालिका सुरेखा पवार, जेष्ठ नृत्यांगणा रेष्मा परितेकर व मान्यवरांचे उपस्थितीत वरील घोषणा करण्यात आली. 

              पारंपारीक लावणीची जपणूक, प्रसार आणि लावणी नृत्याचे कलाकार तयार होण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येथील जय अंबीका कला केंद्रात १५ ते २५ मार्च या दरम्यान मोफत लावणी सादरीकरण व गायन मोफत प्रशिक्षण सुरू झाले आहे. सर्वांसाठी खुला सहभाग असलेल्या या शिबीराचे उद्घाटन उपसरपंच राजुआण्णा दरेकर यांनी केले. वरील मान्यवरांसह यावेळी व्यासपिठावर जेष्ठ नृत्यांगणा बरखा जळगावकर, कॉंग्रेसचे शिरुर तालुकाध्यक्ष वैभव यादव, बाजार समिती संचालक दत्तात्रय हरगुडे, ग्राहक कल्याण फौंडेशनचे संस्थापक सदस्य सतीश साकोरे, जयअंबिका कलाकेद्राच्या संचालक सुरेखा पवार, कलाकेंद्र व्यवस्थापिका चंदाबाई घाटसावळीकर, वर्षा परितेकर, वैशाली समसापुरकर, पुजा भूमकर, लावणी क्षेत्रातील युवा कलाकार व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना रेष्मा परितेकर यांनी लावणी परदेशात सादर केल्याचे अनुभव सांगत पारंपारीक लावणी आता जागतिक स्तरावरही लोकप्रिय होत असल्याचे सांगितले. वैभव यादव व दत्तात्रय हरगुडे यांनी जय अंबीका कलाकेंद्राकडून गावातील विकास कामांमध्येही मोठा हातभार लावल्याचे यावेळी सांगितले. दरम्यान गावातील तीन कलाकेंद्रांचा आढावा घेत व लावणीला चांगले व्यासपिठ निर्माण करण्याच्या उद्देशाने लवकरच सणसवाडीत सणसवाडी लावणी महोत्सव सुरू करण्याची घोषणा श्री दरेकर यांनी केली व या कामी महाराष्ट्र शासनाकडूनही या उपक्रमाला सहकार्य व्हावे म्हणून उर्जाराज्य मंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे, आमदार माऊली कटके, आमदार निरंजन डावखरे यांचेकडेही पाठपूरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

शुरांगणांची परंपरा शिरुरमध्ये मस्तानीच्या निमित्ताने : राज गायकवाड (संस्थापक विश्वस्थ, बाजीराव मस्तानी प्रतिष्ठाण, पाबळ –  शिरुरची भूमि ही मस्तानीच्या निमित्ताने सौंदर्य, नृत्य आणि साहस या त्रिगुणांनी गाजली आहे. आजही सणसवाडीतील लावणीची तिच परंपरा शिरुरकरांना अपेक्षित असून तीन-तीन लावणी कलाकेंद्रात पारंपारीक लावणी जपली जात असेल तर हे शिरुरचे वैभव असून शिरुर हा शुरांगणांचा तालुका असल्याचेही  बाजीराव मस्तानी ट्रस्टचे संस्थापक विश्वस्थ राज गायकवाड यांनी सांगितले. 

विठ्ठल कुडाळकरच्या ढोलकीने बनविला माहोल – लावणी प्रशिक्षण शुभारंभ करताना ढोलकी वाजली पाहिजे म्हणून विठ्ठल कुडाळकर या युवा ढोलकी वादकाला यावेळी बोलावले. ना तुणतुणे, ना टाळ, ना हर्मोनियम अशात अचानक ढोलकीच्या कडक थापेने सुरू केलेल्या वादनाने संपूर्ण हॉल भरुन पावला. नमन, तोडे, तिहाई आणि काही पारंपारीक अस्खलित वळणाच्या लग्ग्यांनी विठ्ठलने दहाच मिनीटाच्या वादनाने सर्वांना प्रभावित केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!